गडचिरोली : गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वडधा नजीकच्या मौशीखांब येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचे काम पूर्ण होऊनही जुन्याच पडीक इमारतीतून कारभारत चालत असल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जुन्या इमारतीमुळे पशुपालकांसह कर्मचाऱ्यांच्याही जीविताला धोका निर्माण झाला आहे. मौशीखांब येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची जुनी इमारत मोडकळीस आल्याने त्या ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली होती. याची दखल घेऊन जि. प. प्रशासनाने तीन वर्षापूर्वी गावापासून अर्धा किमी अंतरावर असलेल्या नवीन वस्तीमध्ये इमारतीचे बांधकाम सुरू केले व इमारतीचे बांधकाम पूर्णही करण्यात आले. परंतु अद्यापही जुना पशुवैद्यकीय दवाखाना नवीन इमारतीमध्ये हस्तांतरित करण्यात आला नाही. अनेक दिवसांपासून नवीन दवाखान्याच्या इमारतीत दवाखान्याचा कारभार सुरू करण्यात यावा, अशी मागणी पशुपालकांकडून होत असतानाही संबंधित विभागाने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत अनेक दिवसांपासून जीर्णावस्थेत असल्याने इमारतीचे फाटे मोडकळीस आल्याच्या स्थितीत आहेत. छतामधून पावसाळ्याचे पाणी गळत असल्याने अनेक टेबल, खुर्च्या व इतर साहित्य खराब होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. काही दिवसातच पावसाळ्याला सुरूवात होत असल्याने पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत कधीही कोसळू शकते. मौशिखांब येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात परिसरातील बेलगाव, रानखेडा, मरेगाव, चांभार्डा आदी गावातील पशुपालक आपल्या जनावरांचे उपचार करीत असतात. त्यामुळे दवाखान्याची इमारत तसेच परिसर सुसज्ज असणे आवश्यक होते. परंतु पशुवैद्यकीय विभागाच्या बेजबाबदार वागण्यामुळे जुन्याच इमारतीतून कारभार चालू आहे. त्यामुळे नवीन इमारतीतून दवाखान्याचे कामकाज चालवावे, अशी मागणी आहे.
जुन्याच इमारतीतून पशुवैद्यकीय दवाखान्याचा कारभार
By admin | Updated: June 23, 2014 23:53 IST