वैरागड : वैलोचना नदीच्या तिरावर असलेल्या पाणी पुरवठा योजनेजवळील वैरागड कढोली मार्गावरील बोरकर यांच्या मालकीच्या जमिनीतील आंब्याच्या झाडाची मोठी फांदी वादळाने विद्युत तारेवर कोसळल्याने मागील पाच दिवसांपासून पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. मंगळवारच्या रात्री वैरागड परिसरात सुसाट्याच्या वार्यासह जोरदार पाऊस झाला. वार्यामुळे आंब्याच्या झाडाची फांदी विद्युत तारेवर कोसळली. तेव्हापासून पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत झाला. झाडाची फांदी तत्काळ दुसर्या दिवशी उचलणे आवश्यक होते. मात्र चार दिवसांचा कालावधी लोटूनही फांदीची विल्हेवाट लावण्याचे काम पूर्ण करण्यात आले नाही. पाणी पुरवठ्याची गरज लक्षात घेऊन सात ते आठ मजूर लावून फांदी उचलण्याची तत्परता ग्राम पंचायतीने दाखविली नाही. विशेष म्हणजे, एकाही ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्याने प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली नाही. यावरून सरपंच व ग्रामपंचायतीचे सदस्य गावातील समस्यांबाबत किती जागृत आहेत, याचा अंदाज बांधता येतो. भर उन्हाळ्यात मागील पाच दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. झाडाची फांदी तत्काळ उचलून विद्युत पुरवठा सुरू करून पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)
वैरागडातील पाणी पुरवठा पाच दिवसांपासून बंद
By admin | Updated: May 11, 2014 00:21 IST