चामोर्शी तालुका जिल्ह्यात सर्वांत मोठा तालुका असून तालुक्यात १९९ गावात १ लाख ७९ हजार लोकसंख्या आहे. एक वर्षापासून कोरोनाने दहशत घातल्याने लॉकडाऊन, संचारबंदी असे अनेक उपाय करण्यात आले. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कोरोनाने डोके वर काढल्याने शासनाने कोरोना योद्धा व ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व आजार असलेले, नसलेले ४५ वर्षांवरील नागरिकांना चामोर्शी व आष्टी ग्रामीण रुग्णालय, हे दोन व भेंडाळा, घोट, आमगाव महाल, रेगडी, कुनघाडा, येणापूर, मार्कडा कं., आदी सात व एकूण नऊ केंद्रांवरून १६ जानेवारी ते २८ एप्रिल या कालावधीत १० हजार ६८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती चामोर्शी आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तालुक्याचा विचार करता लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी तालुका प्रशासनाकडून जनजागृती करणे गरजेचे असून चामोर्शी शहरासह ग्रामीण भागात लसीकरण केंद्र वाढविणे गरजेचे आहे.
याबाबत तालुका आरोग्याधिकारी डॉ. भूषण लायबर यांच्याशी संपर्क साधला असता तालुक्याला लस उपलब्ध झाली असून, सध्या तालुक्यात सुरू असलेल्या नऊ लस केंद्रांवरून नागरिकांनी लस टोचून घ्यावी. चामोर्शी शहरात लसीकरण केंद्र वाढविण्याच्या दृष्टीने वरिष्ठांशी चर्चा करून जादा केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.