कमलापूर : कोणतेही वाहनखरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास वाव असतो. मात्र वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाहन खरेदी सुरू असल्याने रस्त्यावर लाखो वाहने विम्याशिवाय धावत आहेत. त्यांच्यावर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
गॅस सिलिंडर योजनेचा बट्ट्याबोळ
आरमोरी : वनविभागामार्फत नागरिकांना तसेच वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना अनुदानावर गॅस सिलिंडर कनेक्शन देण्यात आले आहे. मात्र संपल्यानंतर सिलिंडर भरण्यासाठी लांब अंतराच्या गावांकडे जावे लागते. गॅस सिलिंडर रिफिलिंगचे ठिकाणाचे योग्य नियोजन नसल्याने या योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे.
सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटऱ्या उपलब्ध करा
आष्टी : विद्युत वाचविण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र, यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे सौरदिवे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. त्यामुळे नव्याने बॅटऱ्या द्याव्यात, अशी मागणी आहे.
दिना धरणाचे खोलीकरण करा
चामोर्शी : जिल्ह्यातील सर्वांत मोठा सिंचन प्रकल्प म्हणून दिना प्रकल्पाची ओळख आहे. अनेक वर्षांपासून उपसा करण्यात आला नाही. त्यामुळे जलसाठवणूक क्षमता कमी झाली आहे. तलावाचा उपसा व कालवे दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी आहे.
मार्गावरील खांबामुळे रहदारीस अडथळा
गडचिरोली : शहरातील मुख्य मार्गावर तसेच अंतर्गत मार्गावर काही नागरिक फलक लावण्यासाठी मार्गावर खड्डा खोदतात. नंतर खड्डा तसाच ठेवला जातो. परिणामी अपघात होण्याची शक्यता आहे. खड्डे खोदणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
भामरागड तालुक्यातील गावांना विजेची प्रतीक्षा
भामरागड : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यातील अनेक गावांत विजेचे खांब उभे करण्यात आले. त्यावर ताराही ओढण्यात आल्या. मात्र यावर वीजपुरवठा सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे नागरिक अद्यापही विजेच्या प्रतीक्षेत आहेत.
कोरचीतील रस्ते खड्डेमय
कोरची : तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील रस्त्यांची मागील अनेक वर्षांपासून डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावर गवत उगविले आहे. गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी आहे. खड्ड्यांमुळे अपघात हाेण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दुर्गम भागात माेबाइल सेवा कुचकामी
आलापल्ली : येथे बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा बसविण्यात आली आहे. मात्र ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलचा इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे दिली जात आहे. नागरिकांकडून थ्री-जी सेवेचे पैसे घेतले जात असून, सेवा मात्र टू-जी प्रमाणे दिली जात आहे.
रस्त्यांवर बांधकाम साहित्य; कारवाई करा
धानोरा : शहरातील विविध भागात घराचे बांधकाम सुरू असून, बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवत आहेत. लोखंडी गज तोडण्याचे कामही रस्त्यावरच करण्यात येते. त्यामुळे अडथळा निर्माण झाला आहे. नगर पंचायतीच्या वतीने कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे याचे प्रमाण वाढत आहे.
पशुखाद्यांच्या किमती वाढल्या
आलापल्ली : दुभत्या व कष्टाचे काम करणाऱ्या जनावरांना सरकी, ढेप, कडधान्यांचा कोंडा चारला जातो. यामुळे जनावर सुदृढ राहून दूध जास्त देते. वाढत्या महागाईचा फटका पशुखाद्यांनाही बसला आहे. किमती १० टक्क्यांनी वाढल्या. मात्र, त्या मानाने दुधाचे व दुधाच्या पदार्थांचे भाव वाढले नाही.
तलावांच्या दुरुस्तीमुळे सिंचन वाढले
सिरोंचा : तालुक्यातील मामा तलावाच्या माध्यमातून धान पिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. येथील बहुतांश तलाव जीर्णावस्थेत पोहोचले होते. त्यामुळे त्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. ही बाब लक्षात घेऊन शासनाने मामा तलाव व कालव्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. मामा तलावांचे दुरुस्ती झाल्याने सिंचनाचे क्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे.
ओव्हरलोड वाहतूक बंद करण्याची मागणी
देसाईगंज : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोड वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अपघातसुद्धा वाढले. सदर ओव्हरलोड वाहतुकीकडे ठाणेदार व परिवहन अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.
रस्त्यालगत वाहनांवर कारवाई करा
गडचिरोली : गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात अगदी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने उभी केली जातात. सदर वाहनांवर कारवाई होत नसल्याने रस्त्यात वाहन उभे करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कुरखेडातील अंतर्गत नाल्या तुंबल्या
कुरखेडा : शहरातील नाल्यांचा प्रशासनाच्या वतीने अनेक दिवसांपासून नाल्यांचा उपसा करण्यात आला नाही. त्यामुळे नाल्यांमध्ये गाळ, प्लॅस्टिक व इतर कचरा साचला असल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी पाण्याचे डबके निर्माण झाले आहे.
स्मशानभूमींची दुरवस्था वाढली
कुरखेडा : जिल्हा परिषद प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली तरी ग्रामीण भागातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही.
मामीडीताेगूजवळ पूल बांधण्याची मागणी
झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामीडीतोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प राहते. त्यामुळे पुलाची निर्मिती होणे आवश्यक आहे.
सूर्यडाेंगरी रस्ता खड्डेमय
वडधा : परिसरातील देलाेडा ते सूर्यडाेंगरी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गाने आवागमन करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर वाहनांची वर्दळ राहते.