गडचिरोली : जिल्ह्यासह राज्यभरातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासकीय मुलामुलींच्या वसतिगृहात रिक्त असलेल्या एकूण जागांपैकी १५ टक्के जागांवर खास बाब अंतर्गत गरीब, गरजू व हुशार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या संदर्भात सामाजिक न्याय विभागाने १८ जून २०१५ रोजी नवा शासन निर्णय निर्गमित केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात समाज कल्याण विभागाचे मुलामुलींचे मिळून एकूण सहा वसतिगृह आहे. गडचिरोली येथे मुलांचे दोन व मुलींचा एक असे तीन वसतिगृह आहेत. तसेच चामोर्शी येथे मुलांचे, आरमोरी व वांगेपल्ली येथे मुलींचे वसतिगृह चालविले जाते. खास बाब अंतर्गत समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यासाठी विहित मुदतीत आॅनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. खास बाब कोट्यातून कोणत्याही वर्गापासून विद्यार्थी प्रवेशास पात्र राहणार आहे. खास बाब अंतर्गत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत संबंधित जिल्ह्यातील खासदार व आमदार यांच्याकडून १५ सप्टेंबरपर्यंत समाज कल्याण विभागाकडे शिफारस पत्र प्राप्त होणे आवश्यक आहे. या पत्रावर विचार करून रिक्त जागा खास बाब कोट्यातून भरण्यात येणार आहे.
खास बाब अंतर्गत १५ टक्के होणार प्रवेश
By admin | Updated: June 22, 2015 01:29 IST