गडचिरोली : दुसऱ्याच्या घरून मोबाईल लंपास करून विक्री करणाऱ्या दोन आरोपींना १० मोबाईलसह गडचिरोली पोलिसांनी रविवारी जेरबंद केले. सोमवारी जिल्हा न्यायालयाने याप्रकरणातील एका आरोपीस तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. रविवारी दुपारी ३ वाजता रवींद्र दादाजी चहारे रा. कॅम्प एरिया यांनी स्वत:चे मोबाईल घरातून चोरी झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. या तक्रारीवरून गडचिरोली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. रविवारी रात्री ९.३० वाजता संशयाखाली रामनगरातील एका पानटपरीवरून अल्पवयीन आरोपीस पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून प्रत्यक्ष दोन व घरून दोन असे चार मोबाईल संच जप्त करण्यात आले. त्यानंतर रामनगरातील महेश रामदास गंधेवार याला ६ मोबाईल संचासह पोलिसांनी ताब्यात घेतले व आरोपींवर कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला. अल्पवयीन आरोपी दुसऱ्याच्या घरून मोबाईल संचची चोरी करून महेश गंधेवार याला विकत होता. त्यानंतर महेश गंधेवार हा दुसऱ्यांना मोबाईलची विक्री करीत होता. या प्रकरणातील आरोपींना सोमवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधार गृहात केली आहे. तर महेश गंधेवार याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर कारवाई ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनात एएसआय सोमनाथ माने यांनी केली. प्रकरणाची चौकशी पोलीस करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)
दोन चोरट्यांना १० मोबाईलसह अटक
By admin | Updated: August 4, 2014 23:44 IST