चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक : दोन दिवसांनी होता मृतकाचा विवाहआलापल्ली : आलापल्ली-सिरोंचा मार्गावर रोमपल्ली फाट्याजवळ चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात दोघे जण ठार झाले आहे. मृतकामध्ये आसरअल्ली येथील राजू समय्या अपाजी (२३) व सुंकरअली येथील रत्नाकर येरकवार (२२) यांचा समावेश आहे. शोरूममधून नव्याने घेतलेली दुचाकी घेऊन जात असताना हा अपघात झाला. रत्नाकरचा परवा ३० एप्रिल रोजी विवाह असल्याची माहिती मिळाली आहे. सदर अपघात गुरूवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडला. येरकवार व अप्पाजी हे दोघे जण नव्या दुचाकीने आलापल्लीकडून सुंकरअलीकडे जात होते. तर सिरोंचावरून आलापल्लीकडे येणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला रोमपल्ली फाट्याजवळ जबर धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेही जण ठार झाले. या अपघातात दुचाकी पूर्णत: क्षतिग्रस्त झाली. वृत्त लिहिस्तोवर या घटनेची नोंद कोणत्याही पोलीस ठाण्यात करण्यात आली नव्हती. (वार्ताहर)
रोमपल्लीजवळ अपघातात दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2016 01:35 IST