लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : कोरोना संसर्गाची तिसरी लाटही ओसरत आहे. रेल्वेची प्रवासी वाहतूक आता पूर्णपणे सुरळीत झाली आहे. कोरोना काळात धावणाऱ्या गाड्यांचा विशेष दर्जा काढून त्या नियमित झाल्या असल्या तरी कोरोनाकाळापूर्वी रेल्वेत ज्येष्ठ नागरिकांना तिकिटावर मिळणारी ३० टक्क्यांची सवलत अजूनही बंद आहे. त्यामुळे अनेकांच्या खिशाला झळ बसत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीची सवलत पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या पहिल्या लाटेत रेल्वेची प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर हळूहळू रेल्वेसेवा बहाल करण्यात आल्या. गतवर्षी डिसेंबरमध्ये रेल्वेगाड्यांचा विशेष दर्जाही काढण्यात येऊन त्या नियमित गाड्या म्हणून धावू लागल्या आहेत. तथापि, आरक्षित तिकिटांवर प्रवास करण्याची अट मात्र अजूनही लागूच आहे. खिडक्यांवरील तिकीट विक्री अद्यापही सुरू झालेली नाही. याशिवाय कोरोनाकाळापूर्वी रेल्वेच्या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात मिळणारी सवलत अद्याप बंदच आहे.
किती मिळते सवलत?- रेल्वेच्या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना मूळ भाड्याच्या तीस टक्के सवलत देण्यात येते. ही सवलत सर्वच प्रकारच्या श्रेणींमध्ये लागू आहे.- एखाद्या गाडीत प्रवास करण्यासाठी प्रवाशाला १०० रुपये तिकीट असेल तर ज्येष्ठ नागरिकांना केवळ ७० रुपये तिकीट मोजावे लागते.
विशेष रेल्वेचा दर्जा काढला, तरी सवलत बंदच
कोरोना काळात ठप्प असलेल्या रेल्वेगाड्या पुन्हा सुरू केल्यानंतर त्या गाड्या काही महिने विशेष दर्जा म्हणून चालविण्यात आल्या. या गाड्यांच्या क्रमांकापूर्वी शून्य लावण्यात आला होता. आता क्रमांकापूर्वीचा शून्य काढून या गाड्या नियमित म्हणून सुरू करण्यात आल्या आहेत. तथापि, रेल्वेत पूर्वी मिळणाऱ्या बहुतांश सवलती बंद आहेत. याकडे रेल्वेने लक्ष देण्याची गरज आहे.
ज्येष्ठांना फटका
काेराेना लाटेचा फटका ज्येष्ठ नागरिकांनाही बसला. काेराेना कालावधीत शासनाने सामान्य नागरिकांसाठी अनेक याेजना सुरू केल्या. मात्र, ज्येष्ठांसाठी रेल्वेत असलेली ३० टक्के तिकीट सवलत बंद केली. हा ज्येष्ठ नागरिकांवर अन्याय आहे. आता काेराेनाची लाट ओसरत चालली तरी तिकीट सवलत बंदच आहे. - मधुकर मानकर, ज्येष्ठ नागरिक
ज्येष्ठ नागरिकांचे देशाच्या विकासात फार माेठे याेगदान आहे. त्यामुळे त्यांना सुविधा देणे आवश्यक आहे. मात्र, शासन याकडे लक्ष देत नाही. ३० टक्के प्रवास सवलत लवकरात लवकर सुरू करण्याची गरज आहे. - तुकाराम शेंडे, ज्येष्ठ नागरिक