चामोर्शी : चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील नागरिक ट्रॅक्टरच्या सहाय्याने हरणघाट मार्गे मार्र्कंडाकडे जात होते. दरम्यान समोरून एक वाहन आल्याने ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण ढासळून ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून ९ जण जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास दोटकुली बस थांब्यासमोर घडली. शिवाणी अनिल जमनवार (१५), दामिणी गुणाजी मंगर (१३), डिंपल अनिल जाम्पलवार (११), माधुरी रवी करकडे (१५) रा. सर्व हरांबा ता. सावली जि. चंद्रपूर असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर मंजुळाबाई नागपुरे (६५) रा. दाबगाव मोर्शी, वर्षा गुणाजी मंगर (३८) रा. हरांबा, कुसुम पोरटे (६२) रा. हरांबा, सावित्री मांदाळे (६५) हरांबा, कीर्ती संजय कोरडे (५) रा. हरांबा व अन्य चार जण तीन ते चार वर्षाचे बालके किरकोळ जखमी झाले. सावली तालुक्यातील हरांबा येथील कीर्ती संजय कोरडे या मुलीच्या नवसाच्या कार्यक्रमाकरिता एमएच-३४-२९३४ क्रमांकाचे ट्रॅक्टर घेऊन हरणघाट मार्गे मार्र्कंडाकडे ही मंडळी जात होती. किशोर दादाजी गोहणे (३५) रा. हरांबा हा ट्रॅक्टर चालवित होता. सकाळी ९ वाजताच्या सुमारास समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचविण्यासाठी ब्रेक लावल्याने ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून चार गंभीर व पाच जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. गंभीर जखमींना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून किरकोळ जखमींवर भेंडाळाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. या घटनेसंदर्भात चामोर्शी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)
ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली; चार गंभीर
By admin | Updated: March 26, 2015 01:31 IST