हालेवारात अंत्यसंस्कार : मोटारसायकलवर आले होते मारेकरीरवी रामगुंडेवार -एटापल्लीशुक्रवारी सायंकाळी ७.३0 ते ७.४५ वाजताच्यादरम्यान तीन नक्षलवादी दुचाकी वाहनाने एटापल्ली येथील पंचायत समिती सभापतीच्या शासकीय निवासस्थानात आले व त्यांनी सभापतीचे पती माजी पं. स. उपसभापती घिसू मट्टामी यांच्यावर गोळ्या झाडल्या व ते मोटारसायकलने पळून गेलेत. आज मट्टामी यांच्या पार्थीवावर हालेवारा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या पार्थिवाला तीन वर्षाच्या क्रिशने अग्नी दिला. यावेळी अंत्यसंस्काराला संवर्ग विकास अधिकारी लुटे यांच्यासह पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते. एटापल्ली येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही नेता व कार्यकर्ता या अंत्यविधी कार्यक्रमाला हजर नव्हता. घिसू मट्टामी यांनी अडीच वर्ष पंचायत समितीचे उपसभापती पद सांभाळले. त्यानंतर अडीच वर्ष ते पं. स. सदस्य होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात या परिसरात अनेक लोकाभिमूख विकास कामे केलीत. ग्रामीण भागातील लोकांशी त्यांचा चांगला संपर्क होता. त्यानंतर त्यांनी आपली पत्नी ललिता हिला राजकारणात आणले. त्यांच्या पत्नी सध्या पं. स. च्या सभापती आहेत. घिसू मट्टामी हालेवारा परिसरात अत्यंत शांत स्वभावाचे राजकीय नेते म्हणून सर्वदूर परिचीत होते. राजकारणातही त्यांचे कुणी वैरी नव्हते. शुक्रवारी सायंकाळी रोजच्या प्रमाणेच घिसू मट्टामी हे सभापती निवासस्थानाच्या समोरी अंगणात एकटेच खुर्चीवर बसून होते. अचानक दुचाकीने तीन लोक आलेत व त्यांनी गोळीबार केला व मट्टामी ठार झालेत. या घटनेनंतर एटापल्लीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनात परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
तीन वर्षाच्या क्रिशने दिला अग्नी
By admin | Updated: May 30, 2014 23:43 IST