गडचिरोली : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम आरेवाडा ग्रामपंचायतीत पाच कोटींच्या विकासकामावरून एका माजी जिल्हा परिषद अध्यक्षाच्या दिवट्या पुत्राने आदिवासी महिला सरपंचासह सदस्यांना शिवीगाळ करुन धमकावल्याचे प्रकरण समोर आले होते. याप्रकरणात २८ डिसेंबरला अखेर माजी जि.प. अध्यक्षाच्या पुत्रावर ॲट्रॉसिटीनुसार भामरागड ठाण्यात गुन्हा नोंद झाला. सरपंच सरिता वाचामी व इतर सदस्यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार, अहेरी येथील जि.प.चे माजी अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांचा मुलगा शुभम कुत्तरमारे याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला.
आरेवाडा ग्रामपंचायतीत आदिम जमाती संरक्षण तथा विकास कार्यक्रम अंतर्गत आलेल्या पाच कोटींची विकास कामे मंजूर आहेत. अहेरी येथील एका हॉटेलात २१ डिसेंबरला शुभम कुत्तरमारे याने कामे करण्यावरुन सरपंच सरिता राजू वाचामी व इतर सर्व सदस्यांना जातिवाचक शिवीगाळ करित जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर २२ डिसेंबरला आरेवाडा ग्रामपंचायतीत मासिक सभा सुरु होती. यावेळी तेथे येऊन शुभम कुत्तरमारे याने पुन्हा जातिवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. अखेर २८ डिसेंबरला सरिता वाचामी यांच्या फिर्यादीवरुन शुभम कुत्तरमारेविरोधात ॲट्रॉसिटी व धमकावल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. उलट सरपंचांविरोधातच केली तक्रारशुभम कुत्तरमारे याने महिला सरपंच व सदस्यांना दोनवेळा जातिवाचक शिवीगाळ करुन उलट सरपंच सरिता वाचामी व सदस्यांविरोधात तक्रार अर्ज दिला. यात माझ्याविरुध्द हे सर्व जण ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद करु शकतात, असा दावा करुन स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याचा बनाव ओळखला व त्याच्याविरोधातच गुन्हा नोंदवून दणका दिला.