चर्चांना जोर : पक्षांतरामुळे वातावरण तापलेगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी, गडचिरोली, अहेरी या तीन विधानसभा मतदान संघात काट्याच्या लढती होण्याची चिन्ह आहे. बऱ्याच वर्षानंतर चार ते पाच पक्ष प्रथमच मैदानात उतरल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. ६७ आरमोरी विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टी, शिवसेना व काँग्रेस असा तिरंगी सामना आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरविंद पोरेड्डीवार यांनी शुक्रवारी समर्थकांसह काँग्रेस पक्ष सोडल्याने आता या मतदार संघात भारतीय जनता पक्षाचा प्रचार जोर धरू लागला आहे. पोरेड्डीवार समर्थकांकडून या प्रचारात विशेष लक्ष घातले जात आहे. शिवसेनेचे परंपरागत मतदार असल्यामुळे त्यांचाही उमेदवार प्रचारात आघाडी घेऊन आहे. काँग्रेस पक्षाचे परंपरागत मतदार व मागास वर्गीय समाज व तसेच मुस्लिम समाजाच्या भरवशावर काँग्रेस लढतीत रंग भरण्याचे काम करीत आहे. ६८ गडचिरोली विधानसभा मतदार संघात बहुरंगी लढत होईल, असे चित्र आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना या प्रमुख पक्षांमध्ये सामना आहे. भारिप बहुजन महासंघ, बसपा, मनसे आदी उमेदवारही जोरदार प्रचाराला लागले आहे. येथे अनेक गैर आदिवासी मतदारांनी बहिष्काराचा इशारा दिला आहे. मात्र या मतदारांना समजाविण्याचे राजकीय पक्षांकडून सुरू आहे. चामोर्शी तालुक्यात काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाच्या प्रचारात रंग भरत असल्याची चर्चा आहे. शहरी भागात मात्र साऱ्याच पक्षांचा प्रचार दमदारपणे सुरू आहे. शहराच्या स्लम भागात काही राजकीय पक्षांकडून नगदी पैसांचेही वाटप घरोघरी करण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र मतदार राजा योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी शहरी भागात तरी सज्ज आहे. ६९ अहेरी विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत आहे. मात्र या लढतीत निकाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या मताधिक्यावर अवलंबून आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, भाजपकडून अम्ब्रीशराव आत्राम, अपक्ष म्हणून माजी आ. दीपक आत्राम यांच्यात लढत आहे. मुलचेरा तालुक्याच्या बंगाली समाज बहुल भागात साऱ्याच उमेदवारांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. या भागात आदिवासी मतदार मोठ्या संख्येने असल्याने आदिवासींचे आरक्षणात धनगरांना स्थान देण्याच्या प्रश्नावरून येथे प्रचार तापला आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा फायदा येथे होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
तीनही मतदार संघात काट्याच्या लढती
By admin | Updated: October 11, 2014 23:07 IST