गडचिरोली : यावर्षी पहिल्यांदाच अन्नधान्य खरेदी करण्याचे अधिकार प्रकल्प कार्यालयाला देण्यात आले आहेत. त्यासाठी प्रकल्प कार्यालयाने निविदा मागितल्या आहेत. मात्र अजूनपर्यंत निविदेची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने आश्रमशाळांना अन्नधान्याचा पुरवठा झाला नाही. परिणामी अनेक आश्रमशाळांमध्ये अन्नधान्याचा तुटवडा जाणवत असून विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करताना मुख्याध्यापक व अधीक्षकांना कसरत करावी लागत आहे. शाळा सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी उलटला. तरीही आश्रमशाळांना धान्याचा पुरवठा केला नाही. त्यामुळे मागील वर्षी शिल्लक असलेले धान्य व भाजीसाठी उपयोगी असलेले साहित्य वापरून दीड महिना स्वयंपाक करण्यात आला. सहा महिन्यांपूर्वी पुरविलेले काही धान्य व भाजीसाठी उपयोगी साहित्य खराबही झाले आहेत. काही आश्रमशाळांमध्ये अन्नधान्याचा साठा संपण्याच्या मार्गावर आहे. तर काही आश्रमशाळांमधील धान्य १५ दिवसांपूर्वीच संपले आहे. त्यामुळे संबंधित आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करून देताना मुख्याध्यापक, अधीक्षक व स्वयंपाकी यांची फारमोठी पंचाईत होत आहे. आश्रमशाळेतील ही विदारक परिस्थिती बघून काही पालकवर्ग आपल्या पाल्यांना आश्रमशाळांमधून घरीत नेत आहेत.आकस्मिक परिस्थितीत अन्नधान्य खरेदी करण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. मात्र आदिवासी विकास विभागाने ठरवून दिलेले अन्नधान्य खरेदीचे दर मागील वर्षीचे आहेत. त्यामुळे या किंमतीत अन्नधान्य उपलब्ध करून देण्यास कोणताच दुकानदार तयार होत नाही. मागील एक महिन्यांपासून आश्रमशाळांमध्ये अन्नधान्याचे संकट निर्माण झाले आहे. मात्र निविदा प्रक्रिया अजूनही पूर्ण झाली नसल्याने हे संकट कायम आहे. अन्नधान्याची टंचाई लक्षात घेऊन काही विद्यार्थी शाळा सोडून जात आहेत. त्यामुळे शाळा ओस पडण्याची शक्यता आहे. (नगर प्रतिनिधी)
आश्रमशाळांमध्ये धान्याचा तुटवडा कायम
By admin | Updated: August 28, 2015 00:14 IST