झिंगानूर : झिंगानूर-सिरोंचा मार्गावर वनविभागाने लाखो रुपये खर्चून बंधारा बांधला. जवळपासच्या शेतीला पाण्याची सुविधा उपलब्ध होईल व वन्यजीवांसाठीही पाणी राहील, या उद्देशाने बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र, अल्प कालावधीतच बंधारा फुटला आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने याेग्य नियाेजन करून बंधाऱ्याची दुरुस्ती केली नाही.
भेंडाळा बस स्थानकावर गतिरोधक उभारा
चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर असलेल्या भेंडाळा येथील बस स्थानकावर गतिरोधक उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. चामोर्शी-मूलमार्गे, तसेच आष्टीकडे जाणारी शेकडो वाहने भरधाव वेगाने जातात. गतिराेधक निर्माण केल्यास वेगाने धावणाऱ्या वाहनावर आळा बसण्यास साेइस्कर हाेणार आहे.
गंजलेल्या खांबाने अपघाताचा धोका
गडचिराेली : येथील काही वॉर्डांत रस्त्यालगत विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलण्याची मागणी होत आहे. जिल्हाभरात अशा प्रकारचे गंजलेले शेकडो खांब आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. मात्र, या समस्येकडे कायम दुर्लक्ष आहे.
आलापल्ली मार्गावर कचऱ्याचे साम्राज्य
आष्टी : येथील आलापल्ली मार्गावर पेट्राेल पंपाच्या पुढे रस्त्याच्या कडेला माेठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य आहे. दुकानदार येथे कचरा टाकत असल्यामुळे डम्पिंग यार्ड बनले आहे.
ग्रामीण भागात वीजचोरीच्या प्रमाणात वाढ
गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीजचोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने वीज महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र, वीजचोरीचा भुर्दंड इतर नागरिकांना सहन करावा लागत आहे.
मद्यपी वाहन चालकांवर कारवाई थंडबस्त्यात
गडचिरोली : तालुक्यात अनेक दुचाकी, तसेच चारचाकी वाहनधारक दारू प्राशन करून वाहन चालवितात. याकडे वाहतूक, तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
पेंढरी येथे गॅस एजन्सीची गरज
धानोरा : वनविभागामार्फत संयुक्त वनव्यवस्थापनाचे सदस्य व जंगल परिसरातील नागरिकांना अनुदानावर मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. पेंढरी परिसरातील ९० टक्के कुटुंबांकडे गॅस आहे. मात्र, गॅस एजन्सी केवळ धानोरा येथेच आहे. पेंढरी हे परिसरातील मोठे गाव आहे. या गावात गॅस एजन्सी द्यावी.
सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटऱ्या उपलब्ध करा
आष्टी : विद्युत वाचविण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र, यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे सौरदिवे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. त्यामुळे नव्याने बॅटऱ्या द्याव्यात, अशी मागणी आहे.
वनहक्क पट्ट्यापासून नागरिक वंचित
कोरची : शासनाने वनहक्क अधिनियम २००६ अन्वये वनजमिनीचे पट्टे देण्याचे धोरण अमलात आणले आहे. मात्र, कागदपत्रांच्या अटीमुळे अद्यापही जिल्ह्यातील अनेक गरजू व गरीब नागरिक वनहक्काच्या पट्ट्यापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.
मोकाट जनावरांमुळे रहदारी बाधित
आष्टी : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे मधोमध उभे राहतात. त्यामुळे रहदारी बाधित होत असून, वाहनधारकांना नेहमी अपघाताची भीती असते.
चातगावात कव्हरेजची समस्या भारी
धानोरा : तालुक्यातील चातगाव येथील मोबाइल टॉवर व्यवस्थित काम करीत नसल्याने कव्हरेज मिळत नाही. त्यामुळे चातगाव परिसरातील मोबाइलधाकर त्रस्त झाले असून, टॉवर दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. येथील बिघाडाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
धोडराज मार्गावर खड्डे, वाहनधारक त्रस्त
भामरागड : भामरागडवरून धोडराज पाच किमी अंतरावर आहे. दरम्यानच्या मार्गावर खड्डे पडले आहेत. मागील सात वर्षांपासून या मार्गाची दुरुस्तीच करण्यात आली आहे. धोडराजवासीय भामरागड येथे शासकीय कामानिमित्त येतात. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. मागील वर्षी या मार्गाच्या दुरवस्थेत आणखी भर पडली.
ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुर्दशा
आष्टी : जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली, तरी ग्रामीण भागातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले आहेत. त्यामुळे दुरुस्ती करावी, अशी मागणी हाेत आहे. अनेक गावांमध्ये ग्रा.पं. प्रशासनाने स्मशानभूमीची विकासकामे थातुरमातुर केली.
विमा नसलेली वाहने धावतात रस्त्यावर
आष्टी : कोणतेही वाहनखरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास वाव असतो. मात्र, वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाहन खरेदी सुरू असल्याने रस्त्यावर लाखो वाहने विम्याशिवाय धावत आहेत. त्यांच्यावर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
गॅस सिलिंडर योजनेचा बट्ट्याबोळ
आरमोरी : वनविभागामार्फत नागरिकांना, तसेच वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना अनुदानावर गॅस सिलिंडर कनेक्शन देण्यात आले आहे. मात्र, संपल्यानंतर सिलिंडर भरण्यासाठी लांब अंतराच्या गावांकडे जावे लागते. गॅस सिलिंडर रिफिलिंगचे ठिकाणाचे योग्य नियोजन नसल्याने या योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे.
पोर्ला बस स्थानकावर गतिरोधकाची मागणी
गडचिरोली : तालुक्यातील तसेच गडचिरोली-आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथे नेहमीच बस स्थानकावर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वेगात वाहने हाकत असतात. त्यामुळे येथे गतिरोधक उभारावे.
प्लास्टीकमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात
गडचिरोली : शहरात अनेक मोकाट जनावरे फिरत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी परिसरात फेकलेला केरकचरा, प्लास्टीक जनावरे खात असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
साेमनूरच्या विकासाकडे दुर्लक्ष
सिरोंचा : तालुक्यातील सोमनूर संगमाच्या विकासाकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष होत आहे. सोमनूर घाटावर गोदावरी, प्राणहिता व इंद्रावती या तीन नद्यांचा संगम आहे. महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी जत्रा भरत असून, हजारो भाविक उपस्थित राहतात. सोमनूरचा विकास करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
खरपुंडी मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी
गडचिरोली : खरपुंडी मार्गावर डम्पिंग यार्डपर्यंत वीजतारा टाकून खांब गाडण्यात आले आहेत. मात्र, या मार्गावर अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आले नाही. सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी खरपुंडी मार्गावर जातात. या मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी आहे.