गडचिरोली: छत्तीसगडच्या चांपा येथून दगडी कोळसा घेऊन चंद्रपूरकडे निघालेला ट्रक कोरची- कुरखेडा मार्गावरील जांभुळखेडानजीक पेटला. पहाटेपासून पेटलेली आग दुपारी १२ पर्यंत कायम होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
ट्रकने पेट घेताच चालक शिवकुमार (रा. चंद्रपूर) याने वाहनावर नियंत्रण मिळवले व त्यानंतर अग्निशामक दलाला संपर्क केला. सुरुवातीला कुरखेडा नगरपंचायत येथील लहान अग्निशमन वाहन लगेच घटनास्थळावर दाखल झाले . मात्र दगडी कोळसा अत्यंत ज्वलनशील असल्याने आग आटोक्यात येत नव्हती. त्यानंतर देसाईगंज नगरपरिषदेचा अग्निशामक दलाचा बंब पाचारण करण्यात आला. कुरखेडा व देसाईगंज येथील अग्नीशमन चमूकडून संयुक्त रित्या आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने ट्रकचे टायर, डिझेल टॅक, वायरिंग व इतर साहित्य जळून खाक झाले . दुपारी १२ वाजेपर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरूच होते.
वनकर्मचारी, पोलिसांची धाव
- ट्रकची आग लगत असलेल्या जंगलात पसरु नये म्हणून कुरखेडा येथील क्षेत्र
- वनविभागाचे फायर गन पथक घटनास्थळी पोहोचले आहे.
- कुरखेडा पोलिस देखील तैनात असून आगीच्या ज्वालांमुळे ये- जा करणाऱ्या वाहनांना झळ पोहोचू नये, याची खबरदारी घेतली जात होती.