लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: छत्तीसगडमधील नारायणपूर जंगलात २१ मे रोजी झालेल्या चकमकीत प्रतिबंधित भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा (माओवादी) सरचिटणीस नंबला केशवराव ऊर्फ बसवराज यांच्यासह तब्बल २८ माओवादी ठार झाल्यानंतर माओवादी चळवळीत मोठे फेरबदल झाले आहेत. माओवाद्यांचे नेतृत्व आता जहाल नेता थिप्पारी तिरुपती ऊर्फ देवजी (६१) याच्याकडे सोपविण्यात आले आहे. ९ सप्टेंबर यावर शिक्कामोर्तब रोजी झाल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. मात्र, सुरक्षा यंत्रणा व माओवाद्यांनी अद्याप यास अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
नंबला केशवराव ऊर्फ बसवराज याच्या एन्काऊंटरनंतर माओवादी संघटना नव्या नेतृत्वाच्या शोधात होती. तेलंगणातील मल्लोजुला वेणूगोपाल राव ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू (६९) आणि थिप्पारी तिरुपती ऊर्फ देवजी (६१) या दोघांची नावे चर्चेत होती. शेवटच्या क्षणी भूपतीचे नाव मागे पडले व चळवळीची धुरा देवजीकडे सोपविण्यात आली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त करू, अशी घोषणा केलेली आहे. त्यानंतर छत्तीसगड, तेलंगणा, महाराष्ट्र, ओडिशा आणि झारखंडमध्ये नक्षलविरोधी कारवायांना वेग आला आहे. मागील दोन वर्षांत पाचशेहून अधिक नक्षल्यांना विविध चकमकीत ठार करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले. नक्षलवाद्यांचे गड समजले जाणारे अबुझमाड आणि करेगुट्टा परिसरात सुरक्षा दलाकडून दररोज नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत आहे. अशात २१ मे रोजी छत्तीसगडमधील अबुझमाड जंगल परिसरात झालेल्या चकमकीत थेट नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव राव उर्फ बसवराजू ठार झाला. त्याच्यासोबत आणखी २६ नक्षल्यांना टिपण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे चारही बाजूने कोंडीत सापडलेल्या नक्षलवाद्यांसमोर पार्टीचा नवा नेता निवडण्याचे आव्हान होते. यात तेलंगणाच्या आंबेडकरनगर येथील थिप्पारी तिरुपती ऊर्फ देवजी आणि पेदापल्ली येथील मल्लोजुला वेणूगोपाल राव ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू हे दोघेही पार्टीचे पॉलिटब्युरो आणि केंद्रीय समिती सदस्य असल्याने जोरदार चुरस होती.
अखेर देवजी याला माओवाद्यांचा नवा नेता निवडण्यात आले, अशी खात्रीशीर सूत्रांची माहिती आहे. दुसरीकडे यापूर्वीच पीएलजीएच्या पहिल्या बटालियनचा कमांडर हिडमा ऊर्फ संतोष याला विशेष प्रादेशिक समिती सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हिडमा याच्यावर २०१० मधील दंतेवाडा हल्ला आणि २०१९ मध्ये भाजप आमदार भीमा मांडवी यांच्या हत्येसह अनेक रक्तरंजित घटनांचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप आहे. त्याच्यावर ४० लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.
कोण आहे देवजी ?
मल्लोजुला वेणूगोपाल राव ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू (६९) व थिप्पारी तिरुपती ऊर्फ देवजी हा देखील तेलंगणाचाच असून करिमनगरच्या आंबेडकरनगरात तो लहानाचा मोठा झाला. सध्या त्याच्याकडे दक्षिण बस्तरसह 'मिलिट्री कमांड'ची जबाबदारी होती. काही वर्षांपूर्वी त्याची पत्नी सृजनक्का गडचिरोलीतील भामरागड तालुक्याच्या कोठी परिसरात झालेल्या चकमकीत ठार झाली होती. गुरील्ला वारमध्ये निष्णात असलेल्या देवजीचा अनेक चकमकीत सक्रिय सहभाग राहिला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
चळवळीत अनुसूचित जातीतून प्रथमच देवजींच्या रूपाने संधी
भूपती ऊर्फ सोनू गेल्या ४० वर्षांपासून नक्षल चळवळी सक्रिय असून तो सवर्ण आहे. वरिष्ठ नक्षल नेता किशनजी त्याचा मोठा भाऊ होय. अनेक मोठ्या हल्ल्यात त्याचा सहभाग आहे. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी तारक्काने गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. तर अनुसूचित जातीतून येणारा देवजी हा देखील ३५ वर्षांपासून चळवळीत आहे. माओवादी चळवळीत पहिल्यांदाच दलित नेतृत्वाला संधी मिळाली असल्याचे सुत्रांनी सांगीतले.