लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा पोलीस दलात शिपाई पदाच्या १३६ जागांसाठी रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. भरतीसाठी जिल्ह्यातील १६ हजार ८४८ युवक-युवतींनी अर्ज केला हाेता. यातील बहुतांश परीक्षार्थिंनी हजेरी लावली. ही परीक्षा गडचिराेली व सभाेवतालच्या केंद्रांवर घेण्यात आली. त्यामुळे शहरातील मुख्य रस्ते युवकांच्या गर्दीने फुलून गेले हाेते. या परीक्षेसाठी जिल्ह्यातीलच युवक असल्याने फार कमी युवक आदल्या दिवशी मुक्कामास आले हाेते. परीक्षेच्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच युवक गडचिराेली शहरात दाखल हाेण्यास सुरुवात झाली. गडचिराेली शहरात येणाऱ्या धानाेरा, चामाेर्शी, आरमाेरी मार्गाने दुचाकी व चारचाकी वाहनांची रांग लागल्याचे दिसून येत हाेते. तब्बल ४ वर्षांनंतर पोलीस भरती होत असल्यामुळे अनेक उमेदवारांनी अर्ज केले हाेते. एका जागेसाठी जवळपास १२५ जण या प्रमाणात इच्छुक उमेदवारांनी अर्ज केल्यामुळे त्यांची सुरळीतपणे परीक्षा घेण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेपुढे हाेते. परीक्षा केंद्रावर कोणतीही गडबड होऊ नये, यासाठी विविध ठाण्यांमधील पोलीस, राखीव पोलीस आणि होमगार्ड मिळून १६ केंद्रांवर जवळपास २ हजार अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले हाेते. आता युवकांचे लक्ष निकालाकडे राहणार आहे. पाेलीस भरती प्रक्रिया जिल्हा पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल, अपर पाेलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पाेलीस अधीक्षक (अभियान) साेमय मुंडे, अहेरीचे अपर पाेलीस अधीक्ष अनुज तारे यांच्या नेतृत्वात पार पडली.
दीड तास ट्राफिक जाम - चारही बाजूने येणाऱ्या युवकांची चारचाकी व दुचाकी वाहने इंदिरा गांधी चाैकातूनच जात असल्याने या चाैकात जवळपास दीड तास ट्राफिक जाम झाली हाेती. चारही मार्गांवर वाहनांची माेठी रांग लागली हाेती. रविवारी आठवडी बाजार असल्याने गर्दीत आणखी भर पडली. काही युवक शहरातील आतमधील गल्ल्यांमधून दुचाकी वाहने टाकून मार्ग काढत हाेते.
शांततेत पार पडली परीक्षा परीक्षेची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे दाेन हजार पाेलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली हाेती. ही परीक्षा शांततेत पार पडली.