चातगाव : गडचिरोली ते धानोरा मार्गावर चातगाव हे वर्दळीचे मध्यवर्ती ठिकाण आहे. चातगाव येथून धानोरा, कारवाफा, रांगी, गिलगाव व इतर भागात जाता येते. त्यामुळे चातगाव येथील बसस्थानकावर नेहमी प्रचंड गर्दी असते. मात्र बसस्थानक परिसरात पुरूष व महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याने अनेकांची घुसमट होते. यासंदर्भात चातगाव येथे तंटामुक्त गाव समितीने महत्त्वाचा निर्णय घेऊन बसस्थानक परिसरात महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे महिलांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा होणार आहे.चातगाव येथे महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याने प्रचंड अडचण होत असल्याची समस्या गेल्या अनेक दिवसांपासून ऐरणीवर आली होती. या समस्येबाबत तंटामुक्त समितीच्या सभेत विस्तृत चर्चा करण्यात आली. तंटामुक्त समितीने स्वच्छतागृह बांधण्याचा निर्णय घेतला असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती चातगाव येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू जीवानी यांनी दिली.
तंमुसच्या पुढाकाराने स्वच्छतागृह होणार
By admin | Updated: March 26, 2015 01:26 IST