धोडराज येथे कार्यक्रम : शिक्षणाची कास धरण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आवाहन भामरागड : पोलीस मदत केंद्र धोडराज येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यादरम्यान दहा जोडप्यांचा विवाह लावून देण्यात आला. या जनजागरण मेळाव्याला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, सीआरपीएफ ३७ बटालियनचे कमांडंट मीना, अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक रामा राजास्वामी, भामरागडचे तहसीलदार नरेंद्र देशमुख, सीआरपीएफचे कमांडंट हरिशचंद्र मनोरी, मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. जुवी नाल्यावर बांधण्यात आलेल्या बाबलाई माता पुलाचे उद्घाटन केल्यानंतर जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला परिसरातील ८०० ते १००० नागरिक उपस्थित होते. शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. याच मेळाव्यादरम्यान नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर दहा जोडप्यांचा विवाह लावून देण्यात आला. वर-वधूंना कौंटुबिक साहित्य, विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वितरण करण्यात आले. मेळाव्यादरम्यान मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, नक्षल्यांच्या खोट्या आश्वासनाला बळी न पडता सरकार, प्रशासन व लोकशाहीवर विश्वास ठेवावा. आर्थिक परिस्थिती कितीही नाजूक असली तरी प्रत्येकाने आपल्या पाल्याला शिक्षण देऊन त्याला सुशिक्षित करावे, आर्थिक, सामाजिक परिस्थिती बदलण्याचे शिक्षण हेच एकमेव माध्यम आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलिसांची नेमणूक झाली आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
जनजागरण मेळाव्यात दहा जोडपी विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2016 02:21 IST