गोविंदगंधचेही विमोचन : विद्याभारती (श्री गोविंदराव मुनघाटे) कला व विज्ञान महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवाची सांगताकुरखेडा : पहिल्या शिक्षण क्रांतीत शिक्षणाचा प्रसार झाला. आता दुसऱ्या शिक्षण क्रांतीत गुणवत्तेत वाढ झाली पाहिजे. आदिवासींच्या मुलांना रशियाचा नकाशा शिकवून फायदा नाही. त्याच्या जीवनाचे वास्तव शाळा महाविद्यालयातून शिकविले पाहिजे. महाविद्यालयातील किती मुले नोकरीवर लागली. यावरून महाविद्यालयाची गुणवत्ता ठरत नाही. ज्या गावातून मुले बाहेर गेली. ती गावाच्या भल्यासाठी किती परत आली. यावरून ठरते. जीवनाशी सुसंगत असे शिक्षण शिकविल्यास हे शक्य आहे, असे प्रतिपादन समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी केले. दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेद्वारा संचालित विद्याभारती (श्री गोविंदराव मुनघाटे) कला व विज्ञान महाविद्यालय कुरखेडा यांचा रौप्य महोत्सवी वर्ष सांगता सोहळा १७ डिसेंबर रोजी महाविद्यालयात संपन्न झाला. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजन गवस, कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर, सहकार नेते अॅड. बाबासाहेब वासाडे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, सचिव प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे, उपाध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य भैय्यासाहेब ठाकरे, प्राचार्य वाघरे, डॉ. सतिश गोगुलवार, सुधीर भातकुलकर, मनोहर हेपट, प्राचार्य कोकोडे, प्राचार्य बुध्दे, वामनराव फाये, माधवदास निरंकार, डॉ. रमेश कटरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्याचा विद्यार्थी बुध्दीने कुठेही कमी नाही. शहरातल्या विद्यार्थ्यात नसलेला प्रामाणिकपणा हा गुण इथल्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. अॅड. बाबासाहेब वासाडे यांनी गडचिरोली जिल्ह्यात शैक्षणिक क्रांतीचे अग्रणी गोविंदराव मुनघाटे हे आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तोडीचे शैक्षणिक कार्य गोनांनी या जिल्ह्यात केले, असे प्रतिपादन त्यांनी केले.कार्यक्रमादरम्यान रामदास सोरते, दुधराव तितिरमारे व महाविद्यालयाच्या जडणघडणीत योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते, माजी विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते ‘गोविंदगंध’ या स्मरणिकेचे विमोचनही करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, संचालन प्रा. नरेंद्र आरेकर तर आभार किशोर खोपे यांनी मानले. प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांच्या सखेसाजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना जीवनाचे वास्तव शिकवा- अभय बंग
By admin | Updated: December 18, 2015 01:47 IST