पालकमंत्र्याचे आवाहन : प्रथमच झाले लाईव्ह प्रक्षेपणगडचिरोली : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण आपल्या या आसेतू हिमाचल अशा देशाला सार्वभौम प्रजासत्ताक घोषीत केले. तो दिवस म्हणजेच प्रजासत्ताक दिन होय. या प्रजासत्ताकाच्या भविष्यातील वाटचालीत आपल्यातील प्रत्येकजण पुढाकार घेणे गरजेचे आहे. आपल्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे, असे आवाहन आदिवासी विकास वने राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. गुरूवारी येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पार पडला. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यानंतर पोलीस दल व गृहरक्षक दल यांची सलामी त्यांनी स्वीकारली. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा सोहळा रंगत गेला. प्रथम या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण फेसबुकच्या माध्यमातून करण्यात आले. पुढे बोलताना पालकमंत्री आत्राम म्हणाले, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यांसाठी ज्यांनी बलिदान दिले. अशा ज्ञात, अज्ञात, देशभक्त आणि हे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सीमारेषेवर प्राणांचे बलिदान देणारे जवान व नक्षलवाद्यांचा मुकाबला करताना शहीद झालेले पोलीस दलाचे जवान यांना आपण श्रध्दांजली अर्पण करतो, असे सांगितले. या सोहळ्यास जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, सीआरपीएफचे महानिरिक्षक दिनेश उनियल, सहायक कमांडर दीपककुमार साहू, मनोजकुमार, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे, नामनिर्देशीत सदस्य प्रमोद पिपरे आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यादरम्यान झालेल्या संचलनात पोलीस, महिला पोलीस पथक, गृहरक्षक दलाचे पथक, शिवाजी हायस्कूलचे एनसीसी आणि स्काऊट पथक, पोलीस दलाचे श्वान पथक तसेच बॉम्बशोधक पथक आदी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन सहायक क्रीडा अधिकारी मदन टापरे, गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे शिक्षक ओमप्रकाश संग्रामे यांनी केले तर आभार जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी मानले. कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आठ स्काऊट गाईडचा गौरवप्रजासत्ताक दिन सोहळ्यात पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्यातील विविध शाळांच्या आठ राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त स्काऊट गाईड्स विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये सुरज प्रमोद थोरात, मृणाल प्रविण मोडक, आचल मनोहर ढोके, प्रज्ञा जगन्नाथ जांभुळकर, रोशनी विठ्ठल दुधबळे, चेतना संजय भोयर, रश्मी वसंत वालके, पोर्णिमा पुंडलीक चौधरी यांचा समावेश आहे. राष्ट्रीय स्तरावरील हरियाणा येथे झालेल्या क्रीडा स्कॉय मार्शल आर्ट स्पर्धेत विजयी झालेल्या एंजल देवकुले व रज्जत सेलोकर यांचा सन्मानपत्र देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कर्तव्य पालन करून राष्ट्राच्या वाटचालीसाठी पुढाकार घ्या
By admin | Updated: January 28, 2017 01:15 IST