गडचिरोली : स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने सन २०१७, २०१८ व २०१९ या वर्षात तीनदा मोकाट डुक्कर पकडण्याची मोहीम राबविण्यात आली. मात्र पुन्हा शहराच्या विविध भागात मोकाट डुकरांचा हैैदोस वाढला आहे. पालिकेने डुक्कर पकडण्याची मोहीम सुरू करावी, अशी मागणी आहे.
खड्ड्यांमुळे २५ किमी फेरा
अहेरी : अहेरी-कन्नेपल्ली मार्गावर खड्डे पडल्याने या मार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र मार्गाच्या दुरूस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अहेरी-कन्नेपल्ली मार्ग सोयीचा आहे. या मार्गाची लवकर दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
राजनगरी अहेरीत घाणीचे साम्राज्य
अहेरी : स्थानिक नगर पंचायत स्वच्छतेबाबत फारशी आग्रही नाही. अनेक ठिकाणी नाल्यांचे बांधकाम अपूर्ण आहे. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहताना दिसून येत आहे. अहेरी नगर पंचायतीची स्थापना २३ एप्रिल २०१५ रोजी झाली. मात्र अद्याप समस्या सुटल्या नाही.
अवाढव्य शुल्काने बेरोजगार हैराण
गडचिरोली : विविध शासकीय विभागाच्या नोकर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या कामासाठी खासगी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटकडून संबंधित उमेदवाराकडून अवाढव्य शुल्क वसूल केले जात आहे. त्यामुळे शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करणारे बेरोजगार युवक हैराण झाले.
पशुखाद्यांच्या किमतीत भरमसाठ वाढ
आलापल्ली : दुभत्या व कष्टाचे काम करणाऱ्या जनावरांना सरकी, ढेप, कडधान्यांचा कोंडा चारल्या जातो. यामुळे जनावर सुदृढ राहून दूध जास्त देते. वाढत्या महागाईचा फटका पशुखाद्यांनाही बसला आहे. किमती १० टक्क्यांनी वाढल्याने पशुपालक अडचणीत आहेत.
आरोग्य उपकेंद्र बांधा
गडचिरोली : उपकेंद्र गावातीलच एका लहानशा भाड्याच्या खोलीत चालविले जात आहे. इमारत नसल्याने प्रसूती कक्षाची सुविधा नाही. त्यामुळे लांब अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर मातांना प्रसूतीसाठी न्यावे लागत आहे. आरोग्य उपकेंद्रासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याची मागणी होत आहे.
उद्याेग उभारण्याची मागणी
भामरागड : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या भामरागड तालुक्यात उद्याेगधंदे नसल्याने युवकांना बाहेरगावी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करुनही याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे बेराेजगार युवक बाहेर स्थलांतर करीत आहेत. त्यामुळे उद्याेग उभारावे, अशी मागणी आहे.
सुबाभूळसाठी अनुदान द्या
धानोरा : सुबाभूळ लागवडीकरिता शेतकऱ्यांना कृषी व वन विभागाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होतो. त्यामुळे स्थानिक स्तरावरून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन अनुदान द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
लाईनमनची पदे भरा
कुरखेडा : तालुक्यातील अनेक गावांत राईस मिल, आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपाना विद्युत पुरवठा करावा लागतो. परंतु अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. तसेच एकाकडे अनेक गावांचा प्रभार आहे. त्यामुळे लाईनमनची पदे भरावी.
रेपनपल्लीचा पूल जीर्ण
कमलापूर : कमलापूर ते रेपनपल्ली या तीन किमीच्या रस्त्यावरील डांबर जागोजागी उखडले आहे. आतील दगड व गिट्टी बाहेर आली आहे. तसेच या रस्त्यावर असलेले पूल सुध्दा जीर्ण अवस्थेत आहे. सदर पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे या पुलावरून पावसाळ्यात पाणी राहते. येथे नवीन पुलाची गरज आहे.
अनेक रस्ते खड्डेमय
अहेरी : जिल्ह्यातील दुर्गम भागातील जवळपास ३०० गावांना अजूनही जाण्यासाठी रस्ते नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांना पायवाटेचाच आधार घ्यावा लागत आहे. शासनाची सडक योजना दुर्गम गावापर्यंत अद्यापही पोहोचली नाही. या भागातील रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.
सिंचन सुविधेचा अभाव
सिरोंचा : तालुक्यातील झिंगानूर परिसरात धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र या परिसरात सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे धान पीक करपते. या क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
खरपुंडी मार्ग अरूंदच
गडचिरोली : खरपुंडी मार्गाचे रूंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या मार्गाचे रूंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत असली तरी याकडे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावर अपघाताची शक्यता बळावली आहे.