आरमोरी : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वाहने चालवली जात आहेत. मात्र याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष आहे. यामुळे अपघातही घडत आहे. कारवाई करण्याची मागणी होत आहे.
भूखंड देण्याची मागणी
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कैकाडी व तत्सम भटक्या, विमुक्त जमाती आढळून येतात. या जमातीतील शेकडो नागरिकांचा दारिद्र्य रेषेखाली गटात समावेश आहे. त्यामुळे या समाजातील नागरिकांना घर बांधकामासाठी भूखंड व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटरी उपलब्ध करा
आष्टी : ग्रामपंचायतींनी ग्रामीण भागामध्ये सौरदिवे लावले आहेत. मात्र, यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटरी चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे सौरदिवे शोभेच्या वस्तू बनल्या आहेत.
थ्री-जी सेवा सुधारावी
सिरोंचा : बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा बसविण्यात आली आहे. मात्र, ही सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलचा इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे दिला जात आहे. नागरिकांकडून थ्री-जी सेवेचे पैसे घेतले जात आहे.
अंकिसा मार्गावर खड्डे
अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील मुख्य मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गावरून आसरअल्लीदरम्यानच्या गावांतील नागरिक ये-जा करीत असल्याने या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे मार्गाची दुरुस्ती करावी.
कारवाई थंड बस्त्यात
गडचिरोली : तालुक्यात अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक दारू प्राशन करून वाहन चालवितात. याकडे वाहतूक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
ऑनलाइन कामात मंद गती; इंटरनेटमुळे खोळंबा वाढला
गडचिरोली : धानोरा मार्गावर असलेल्या चातगाव येथील बीएसएनएलची इंटरनेट सेवा मागील काही दिवसांपासून विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ऑनलाइन कामे खोळंबली असून, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. चातगाव हे मध्यवर्ती ठिकाण असून, या ठिकाणी अनेक विभागांची शासकीय कार्यालये आहेत. स्टेट बँक, वनविभाग, तलाठी, शाळा, महाविद्यालये आदी कार्यालये आहेत. सध्या सर्व कामे ऑनलाइन केली जात आहेत. याशिवाय या ठिकाणी व्यापारी प्रतिष्ठाने व नेट कॅफे आहे. परिसरातील अनेक नागरिक ऑनलाइन कामे करण्यासाठी येतात. आर्थिक व्यवहार करण्यासाठी येथील स्टेट बँक शाखेत येतात. मात्र, वेळेवर काम हाेत नाही.
कोटगूल परिसरात अनियमित वीजपुरवठा
कोरची : तालुक्याचा बहुतांश भाग अतिदुर्गम व नक्षलग्रस्त आहे. घनदाट जंगलाने तालुका व्यापला असल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यास पूर्ववत करण्यास बराच वेळ लागतो. दुर्गम भागात महावितरण कंपनीने नियमित वीजपुरवठा करावा, अशी मागणी हाेत आहे. कोरची तालुका मुख्यालयापासून कोटगूल क्षेत्र छत्तीसगड सीमेला लागून जवळपास ३० किलोमीटर अंतरावर आहे. दरवर्षी या भागात पावसाळ्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे शेतकरी तसेच या क्षेत्रातील सामान्य जनता त्रस्त झाली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीने या समस्येकडे लक्ष देऊन ती निकाली काढावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. काेरची तालुक्याच्या दुर्गम भागात अनेक गावे जंगलालगत असून झाडांना चिपकून आहेत. परिणामी हलकेसे वादळ आल्यास वीजपुरवठा खंडित हाेताे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तीन ते चार दिवस लागतात. या तालुक्यात वीज कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे.
खडकी फाट्यावर प्रवासी निवारा बांधा
मानापूर/देलनवाडी : कुलकुली-अंगारा मार्गावरील खडकी (सिंगराई) फाट्यावर प्रवासी निवारा बांधावा, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. खडकी हे ११०० लोकसंख्येचे गाव असून, या फाट्यापासून एक किमी अंतरावर मालेवाडा ते आरमोरी व गडचिरोली-अंगारामार्गे प्रवासी वाहने याच मार्गाने ये-जा करीत असतात. येथे प्रवासी निवारा नसल्याने नागरिकांना झाडाझुडपांचा आधार घ्यावा लागतो. ऊन, वाऱ्यापासून संरक्षणासाठी येथे प्रवासी निवारा बांधावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे. राज्य परिवहन महामंडळ तसेच शासनाच्या वतीने बांधण्यात आलेल्या अनेक मार्गावरील प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे कायम दुर्लक्ष झाले आहे. परिणामी प्रवाशांना पानटपरी व दुकानाच्या शेडचा आधार घ्यावा लागताे.
होडरीलगत उंच पूल बांधकामाची मागणी
भामरागड : तालुका मुख्यालयापासून २५ किमी अंतरावर असलेल्या लाहेरी परिसरातील होडरी, गोपणार, लष्कर आदी गावांतील नागरिकांना मोठा नाला ओलांडून लाहेरी अथवा भामरागड येथे यावे लागते. पावसाळ्यात नाल्यातून पाच ते सहा फूट पाणी वाहत असते; परंतु या नाल्यावर पूल नसल्याने नागरिकांना लाकडी डोंग्याने धोकादायक प्रवास करावा लागतो. त्यामुळे या नाल्यावर उंच पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. होडरी, गोपणार, लष्कर आदी गावे लाहेरीपासून दोन किमी अंतरावर नाल्याच्या पलीकडे आहेत. या गावातील नागरिकांना लाहेरी किंवा भामरागड येथे जायचे असेल तर लाकडी डोंग्याचा आधार घ्यावा लागतो. खोल नदीच्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन डोंग्यावर बसून नागरिकांना प्रवास करावा लागतो. डोंग्याशिवाय नागरिकांना पर्याय नसतो. होडरी, गोपणार, लष्कर आदी गावांना जोडण्यासाठी पक्के रस्ते नाही. वीज पुरवठाही नियमित होत नाही.
पक्क्या रस्त्याचे बांधकाम करा
गडचिरोली : शिक्षक कॉलनीत नाली व पक्क्या रस्त्यांचा अभाव असल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथे नाली व पक्क्या रस्त्याचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. चनकाई नगरातील रस्त्याची गतवर्षीच्या पावसाळ्यात दुरवस्था झाली हाेती. आता यावर्षीसुद्धा पावसाळ्यात येथे रस्त्याची समस्या बिकट हाेणार आहे. केंद्र व राज्य शासनाची सडकनिर्मितीची याेजना असली तरी प्रभावी अंमलबजावणी नाही.
निराधारांची विविध कार्यालयांत हेळसांड
गडचिराेली : समाजातील निराधार, दुर्बल घटकास तसेच निराधार वयाेवृद्ध व्यक्तींना जीवन जगण्यासाठी बळ मिळावे, याकरिता राज्य सरकारकडू संजय गांधी निराधार याेजना, श्रावणबाळ सेवानिवृत्त वेतन याेजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग याेजना राबविली जाते. मात्र या याेजनेंतर्गत निराधारांना अर्ज करण्यापासून तर मानधन मिळेपर्यंत विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. विविध प्रशासकीय कार्यालयांत निराधारांना सन्मानाची वागणूक दिली जात नसल्याचे दिसून येते. मानधनही प्रलंबित राहत असल्याने निराधार व्यक्ती आर्थिक अडचणीत सापडत आहे. अनेक शासकीय कार्यालयांत दस्तावेज व दाखल्यासाठी निराधार व्यक्तींची परवड हाेत असल्याचे दिसून येते.
जिमलगट्टात विविध समस्या भारी
अहेरी : अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा रस्ते, वीज, पाणी, आराेग्य, घरकूल, वनहक्क जमिनीचे पट्टे आदींसह विविध समस्या गंभीर बनल्या आहेत. सातत्याने मागणी करूनही शासन व प्रशासनाने येथील समस्या साेडवल्या नाही. अनेक ठिकाणी नळ पाणीपुरवठा याेजना थंड बस्त्यात आहे. जि. प. च्या बऱ्याच शाळांच्या इमारती जीर्ण आहेत. आराेग्य केंद्र व उपकेंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. जिमलगट्टा वळणापासून सिराेंचापर्यंत आलापल्ली मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. या मार्गाची दुरवस्था झाली असून, दुरुस्ती करण्यात आली नाही. या समस्या साेडविण्यात याव्या, अशी मागणी माजी सरपंच पुलय्या वेलादी यांनी केली आहे.
लाइनमन नियुक्त करण्याची मागणी
कमलापूर : अहेरी तालुक्यातील ताटीगुडम, कोडसेलगुडम, छल्लेवाडा, रेपनपल्ली, कमलापूर आदी गावांसाठी लाइनमनची आवश्यकता आहे. त्यामुळे येथे लाइनमनची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात विजेचा लपंडाव आहे. अनेकदा वीज दुरुस्तीची कामे स्थानिक युवकांना जीव धोक्यात घालून करावी लागतात. लाइनमनच्या नियुक्तीसंदर्भात अनेकदा निवेदने देण्यात आली; परंतु या मागणीकडे दुर्लक्षच झाले. ग्रामीण भागात डासांचा प्रादुर्भाव माेठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे रात्री झाेपताना पंखे सुरू ठेवणे आवश्यक आहे. मात्र वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे वीज उपकरणे सुरू राहत नाही. पावसाळ्यात एकदा वीजपुरवठा खंडित झाल्यावर दाेन ते तीन दिवस लागतात. या भागात वीज सेवा मजबूत करणे गरज आहे.
कोरचीत मोकाट जनावरांचा हैदोस
कोरची : येथील मुख्य बाजारपेठेच्या मार्गावर मोकाट जनावरे ठिया मांडून असतात. अनेकदा जनावरांची झुंजही होते. अशावेळी रस्त्याने ये-जा करणाऱ्या लोकांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवसेंदिवस येथे मोकाट जनावरांची संख्या वाढत असतानाही त्यांचा बंदोबस्त करण्याकडे नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. येथील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. दिवसभर जनावरे रस्त्यावर उभी अथवा बसून राहतात. वाहनचालकांना अनेकवेळा अडथळा होतो. याबाबत काही लोकांनी प्रशासनाला कळविले, मात्र लोकांच्या मागणीकडे दुर्लक्षच झाले. माेकाट जनावरांचा बंदाेबस्त नगरपंचायतीच्या वतीने करण्यात यावा, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.