गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील येनापूर येथील शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत असलेल्या नागरिकांच्या झोपड्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने ५ फेब्रुवारी रोजी पाडल्या. त्याचबरोबर शेत जमिनीवरील पिकही उद्ध्वस्त केले. हे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेदरम्यान अन्यायग्रस्तांनी केली आहे.विनायक राऊत व बंडू गड्डलवार हे येनापूर गावानजीक असलेल्या शासकीय जमिनीवर झोपड्या उभारून १९९० पासून राहत होते. शांतू भूषन सरकार यांनीसुद्धा अतिक्रमण करून एक हेक्टर ३० आर जागेवर पीक घेत होते. गमतीदास विठ्ठल राऊत व गौतम हरीमन कुरबडे यांचे तणसीचे ढीग होते. ही सर्व जागा शासकीय असली तरी सातबाऱ्यावर नोंद आहे. त्याचबरोबर ज्या नागरिकांच्या झोपड्या आहेत, त्यांच्या नावाने घरटॅक्स पावतीही आहे. असे असतानाही ५ व ६ फेब्रुवारी रोजी सरपंच नीलकंठ निकाडे, पोलीस पाटील लोभा बंडू गेडाम व इतर काही नागरिकांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने झोपड्या पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या. घरातील संपूर्ण सामानाचीही नासधूस केली. त्यामुळे या कुटुंबासमोर निवाऱ्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या ठिकाणी लावलेली १८० झाडे, तूर, मुग, बरबटी आदींचेही नुकसान केले आहे. शांतू सरकार यांच्या जमिनीतील पाळे फोडून जमीन सपाट केली आहे. विशेष म्हणजे सदर कारवाई करताना कोणतीही नोटीस देण्यात आली नाही. सरपंच व पोलीस पाटील यांनी गावातील काही नागरिकांना हाताशी धरून पदाचा गैरवापर केला आहे. त्यामुळे याप्रकरणी सरपंच व पोलीस पाटलासह सुरेश दुधे, केशव वक्टू गोंगले, दीपक दादाजी पुच्चलवार, केशव बोडावार, भीमराव निमसरकार, आदीत्य जाधव, किरण दुधे, अमृत गोंगले, जैसुक गेडाम यांच्यावर कारवाई करून नुकसानभरपाई द्यावी, भविष्यात त्यांच्यापासून असलेला धोका लक्षात घेऊन संरक्षण द्यावे, अशीही मागणी केली आहे.
येनापुरात झोपड्या पाडणाऱ्यांवर कारवाई करा
By admin | Updated: February 22, 2015 01:24 IST