गडचिरोली : विधानसभेच्या प्रचार धुमाळीत रोजंदारी कार्यकर्त्यांची नेत्यांकडून चांगली बडदास्त ठेवली जात आहे. या कार्यकर्त्यांचे चांगलेच भाव वधारले आहेत. नेत्यांच्या बैठका, रॅली यासाठी मोठ्या प्रमाणावर सर्वच राजकीय पक्षांकडून रोजंदारी कार्यकर्त्यांची मागणी आहे.ग्रामीण भागातसुद्धा रोजंदारी कार्यकर्त्यांच्या भरवशावरच राजकीय पक्षांचे कार्यक्रम सुरू आहेत. या रोजंदारी कार्यकर्त्यांसाठी २०० रुपये रोज त्यांना एक वेळचे जेवण आणि एक वेळ नाष्टा आणि चहा हे दिले जाते. शिवाय त्यांच्या प्रचाराचा वेळही ठरलेला आहे. ११ ते ५ या वेळेतच हे रोजंदारी कार्यकर्ते प्रचार करत आहेत. या रोजंदारी कार्यकर्त्यांची बडदास्त ठेवली जात असल्याने पक्षातील शेवटच्या फळीतील कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. हा प्रकार पाहून अनेक निष्ठावान कार्यकर्ते आपल्याच उमेदवाराच्या विरोधात काम करण्याच्या मानसिकतेत आहेत. रोजंदारी कार्यकर्ते हे पक्षाचे शेल्या, टोप्या खांद्यावर घेतात. त्यानंतर ते काढून फेकले जाते. दुसऱ्या दिवशी वेगळ्याच उमेदवाराच्या प्रचार रॅलीत हे हजेरी लावतात. काही उमेदवारांकडून तर ५०० रुपयापर्यंत रोज दिला जात आहे. आता नेते येत असल्याने त्यांच्यापुढे फ्लॉप शो होऊ नये म्हणून काहीही करून रोजंदारी कार्यकर्ते जमविण्याची जबाबदारी टाकली जात आहे. या सर्व प्रकारांनी पक्षावर निष्ठा असलेल्या खऱ्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी असल्याचे दिसून येते. आपण पूर्वीपासून पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम केले. मात्र रोजंदारी कार्यकर्त्यांवरच नेतेमंडळी मेहरबान असल्याचा आरोपही या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. (शहर प्रतिनिधी)
रोजीचे मजूर बनले उमेदवारांच्या गळ्यातील ताईत
By admin | Updated: October 9, 2014 23:03 IST