४ लाखांचा खर्च येणार : सामाजिक संघटनांना मदतीसाठी आवाहनकमलापूर : अहेरी तालुक्यातील देचलीपेठा येथील भाग्यश्री लक्ष्मण दुर्गे ही अहेरी येथील भगवंतराव विज्ञान महाविद्यालयात इयत्ता १२ वीला शिक्षण घेणारी विद्यार्थिनी आहे. भाग्यश्रीला कॅन्सरने ग्रासले असून तिला बारावीच्या परीक्षेलाही बसता आले नाही. सध्या तिच्यावर मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून उपचारासाठी ४ लाख रूपये खर्च अपेक्षीत आहे. भाग्यश्रीच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिच्या पालकांनी दानदात्यांना आर्त हाक दिली आहे. देचलीपेठा येथील लक्ष्मण दुर्गे यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. यातच भाग्यश्रीचे कसेबसे शिक्षण सुरू होते. मात्र तिला अचानक कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले. तिला उपचारासाठी मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. मात्र उपचारासाठी लागणारे चार लाख रुपये कुठून आणायचे, हा प्रश्न दुर्गे कुटुंबीयांपुढे उभा ठाकला आहे. यामुळे मुलीच्या उपचारासाठी काही सामाजिक संस्था, दानदात्यांकडून अपेक्षा आहे. मागिल अनेक दिवसांपासून लक्ष्मण दुर्गे मुलीच्या उपचारासाठी रक्कमेची जुळवाजुळव करण्यासाठी पोटतिडकीने प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांच्या हाकेला अजूनपर्यंत कुणीही प्रतिसाद दिले नाही.कमलापूर परिसरातील काही युवकांना ही बाब माहिती होताच सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्याध्यापक पेंदोर, शिक्षक सिडाम, राठोड, शिक्षिका बारसागडे, वनपरीक्षेत्र अधिकारी लाड, तुरकर, बाबा आमटे फाऊंडेशनचे प्रविण चौधरी, राजू गुंडमवार, श्रीधर दुग्गीरालापाटी, सचिन ओलेटीवार, भास्कर तलांडी, सतिष दैदावार यांनी पुढाकार घेवून भाग्यश्रीच्या उपचारासाठी मदत करण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी परिसरातील सामाजिक संस्था, दानदाते, नागरिक यांच्याशी संपर्क साधण्यास सुरूवात केली आहे.काही दिवसांपूर्वी सिरोंचा येथील सायली नामक विद्यार्थिनीला कॅन्सरने ग्रासले होते. तिच्याही घरची परिस्थिती लक्षात घेता हेल्पिंग हॅन्ड्ससारख्या संस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देवून सायलीचे प्राण वाचविले. यामुळे भाग्यश्रीच्या कुटूंबीयांनाही आशा असून दानदाते नक्कीच भाग्यश्रीच्या उपचारासाठी मदत करतील, असे लक्ष्मण दुर्गे यांनी बोलून दाखविले आहे. (वार्ताहर)
कॅन्सरग्रस्त भाग्यश्री दुर्गेच्या कुटुंबीयांकडून मदतीसाठी टाहो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2017 00:50 IST