गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने साईराम बहुउद्देशिय ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष रोहीत बोम्मावार, उपाध्यक्ष राकेश पेद्दुरवार, सचिव विजय कुर्रेवार, कोषाध्यक्ष सुरज बोम्मावार यांचा जामीन फेटाळून लावला. त्यामुळे आता या चौघांनाही गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण करावे लागणार आहे.डिसेंबर महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आलेल्या या शिष्यवृत्ती घोटाळ्यात कै. राहुलभाऊ बोम्मावार कॉलेज चामोर्शीचे संचालक सुरज बोम्मावार, रोहीत बोम्मावार व पेद्दुरवार, कुर्रेवार यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. ६ जानेवारीला या चारही आरोपींनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. यांच्यावर ९ वेगवेगळ्या प्रकरणात पोलिसात गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाने राकेश पेद्दुरवार व विजय कुर्रेवार या दोघांना जामीन मंजूर केला होता. त्याला गडचिरोली पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. त्यावर बुधवारी सुनावणी नागपूर हायकोर्टात झाली. हायकोर्टाने दोघांचाही जामीन रद्द केला. तर दुसऱ्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात चौघांच्या जामीनावर सुनावणी होऊन त्यांचा जामीन रद्द करण्यात आला.तब्बल तीन ते साडेतीन महिन्यांपासून बोम्मावार बंधू व अन्य दोन आरोपी पोलिसांना न्यायालयीन लढाईत अडकवून पसार होते. अखेरीस गडचिरोली पोलिसांनी न्यायालयात सर्व बाबींची पूर्तता करून त्यांचा जामीन रद्द करविला. त्यामुळे आता बोम्मावार बंधूसह कुर्रेवार, पेद्दुरवार यांना पोलिसांसमोर आत्मसमर्पणाशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने या आरोपींचा जामीन रद्द केल्याची माहिती विशेष तपास अधिकारी पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
सर्वोच्च न्यायालयाने बोम्मावार बंधूंचा जामीन फेटाळला
By admin | Updated: April 2, 2015 01:41 IST