अहेरी : विहिरींमध्ये साचलेला गाळ, बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना व हातपंप यामुळे अहेरी तालुक्यता पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिक व प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही तर उन्हाळ्याची चाहूल असून मे व जून हे दोन महिने आणखी शिल्लक आहेत. या कालावधीत तालुक्यातील पाणीटंचाईची समस्या तीव्र होणार असून प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास पाणी संकट आणखी गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.एप्रिल महिन्याला सुरुवात होताच गडचिरोली जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या सुरू होते. यापासून अहेरी तालुका सुद्धा अपवाद नाही. एप्रिल महिन्याची ऊन पडू लागताच विहिरीतील पाण्याची पातळी कमी होण्यास सुरुवात होते. तालुक्यातील बहुतांश नागरिक शेतीचा व्यवसाय करीत असल्याने या नागरिकांना स्वत:ची तहाण भागविण्याबरोबर पाळीव प्राण्यांच्याही पाण्याची व्यवस्था करावी लागते. उन्हाळ्यात पाण्याची गरज वाढते. मात्र जलसाठे निकामी होत असल्याने पाण्याचे प्रमाण कमी होते. अशी विपरित परिस्थिती निर्माण होते. ग्रामीण भागातील पाण्याची गरज हातपंप व विहिरीच्या माध्यमातून पूर्ण केल्या जाते. मात्र विहिरींमधील गाळ मागील अनेक वर्षांपासून ग्राम पंचायतीच्या मार्फतीने उपण्यात आला नाही. त्यामुळे विहिरीचे जलस्त्रोत कमी झाले आहेत. विहिरींमध्ये साचलेल्या गाळामुळे विहिरींची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. याबाबत गावकऱ्यांकडून ग्राम पंचायतीला कळविण्यात येते. मात्र ग्राम पंचायत प्रशासन निधी नसल्याचे कारण पुढे करीत विहिरीतील गाळाचा उपसा करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. दिवसेंदिवस भूगर्भ पातळी खोलात जात असल्याने बहुतांश विहिरी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच कोरड्या पडतात. गावाला पाणीपुरवठा करण्याचे दुसरे साधन हातपंप आहे. मात्र हातपंपाची स्थितीसुद्धा फारशी चांगली नाही. बहुतांश हातपंप बंद असल्याने सदर हातपंप केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. याबाबत पंचायत समिती प्रशासनाकडे अनेकदा तक्रार करून त्याचा काहीही फायदा होत नाही. तालुक्यातील दुर्गम भागात पाणीटंचाईची समस्या तीव्र होते. मात्र या गावांना प्रशासनातील अधिकारी भेट देत नसल्याने या गावांमधील समस्या प्रशासनाच्या लक्षात येत नाही. नागरिकांना मात्र पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागतात. (तालुका/शहर प्रतिनिधी)
उन्हाळ्याची चाहूल; पाण्यासाठी भटकंती
By admin | Updated: April 20, 2015 01:29 IST