ंजिल्हा परिषद : विशेष सभा बोलविण्यासाठी जि. प. अध्यक्षांना वेळच नाहीगडचिरोली : जिल्हा परिषदेच्या सभापतींची निवडणूक २ आॅक्टोबर रोजी पार पडली. त्यानंतर तीन ते चार दिवसात जि. प. अध्यक्षांनी विशेष सभा बोलावून विषय समित्यांच्या खाते वाटपाची कार्यवाही करायला पाहिजे होती. मात्र सभापतींची निवडणूक आटोपून १८ दिवसांचा कालावधी लोटला असूनही जि. प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी विशेष सभा बोलाविली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे खाते वाटप रखडले आहे. यावरून विशेष सभेची तारीख निश्चित करण्यासाठी जि. प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांच्याकडे वेळच नसल्याचे स्पष्ट होते.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक २१ सप्टेंबर रोजी पार पडली. त्यानंतर २२ आॅक्टोबर रोजी सभापतींची निवडणूक पार पडली. यानंतर दोन ते तीन दिवसात जिल्हा परिषदेमध्ये विशेष सभा बोलावून विषय समित्यांचे खाते वाटप होणे आवश्यक होते. साधारणत: २४ ते २५ आॅक्टोबरला विशेष सभा बोलावून खाते वाटपाची कार्यवाही पूर्ण व्हायला पाहिजे होती. मात्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यामुळे जि. प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी विशेष बैठकीची तारीख निश्चित केली नाही. यावरून जि. प. अध्यक्ष कुत्तरमारे यांनी आपल्या अधिकाराचा योग्य वापर केला नसल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा १८ जून २०१४ रोजी झाली होती. त्यानंतर २३ जुलै २०१४ ला जिल्हा परिषदेची विशेष सभा पार पडली. १७ सप्टेंबर २०१४ रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधरण सभा घेणे आवश्यक होते. मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींच्या निवडणुकीमुळे या तारखेला सर्वसाधारण सभा घेता आली नाही. विषय समित्यांच्या खाते वाटपाबाबतची विशेष सभा २२ आॅक्टोबरला घेणे आवश्यक होते. यासंदर्भात सभापतींची निवडणूक पार पडल्यानंतर दोन ते तीन दिवसात जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) विजय मुळीक यांनी विषय समित्यांच्या खाते वाटपासंदर्भात विशेष बैठकीची तारीख निश्चित करण्यासाठी जि. प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांच्याकडे फाईल सादर केली असल्याची माहिती जि. प. च्या प्रशासकीय सुत्रांकडून मिळाली आहे. मात्र जि. प. अध्यक्ष कुत्तरमारे यांनी विशेष बैठकीची तारीख निश्चित न केल्यामुळे जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे खाते वाटप रखडले आहे. सभापतींची निवडणूक पार पडल्यानंतर जि. प. च्या सर्व १० ही समित्यांच्या सदस्यांचे पद रिक्त झाले आहेत. सदर पदे भरण्यासाठी खाते वाटप होणे आवश्यक आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
विषय समित्यांचे खाते वाटप रखडले
By admin | Updated: October 21, 2014 22:50 IST