लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनात (शालेय पोषण आहार) आता १२ प्रकारचे खाद्यपदार्थ बनवून दिले जाणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने निर्गमित केला आहे. यामुळे मध्यान्ह भोजनाची चव पुन्हा रुचकर होण्यास मदत होणार आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत मध्यान्ह भोजन दिले जाते. राज्यस्तरावरून शाळांना तांदूळ, डाळ उपलब्ध करून दिली जाते. त्यापासून तीन प्रकारचे खाद्यपदार्थ बनविण्याचे निर्देश ११ जून २०२४ च्या शासन निर्णयात देण्यात आले होते. मात्र, तीनच प्रकारचे खाद्यपदार्थ खाणे विद्यार्थ्यांना कंटाळवाणे होत होते. यात सुधारणा करण्याच्या सूचना २८ जानेवारी रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात करण्यात आल्या आहेत, हे विशेष.
या व्यंजनांचा आस्वाद घेता येणार
- व्हिजिटेबल पुलाव, मसाले भात, मटार पुलाव, मूगडाळ खिचडी, चणा पुलाव, सोयाबीन पुलाव, मसुरी पुलाव, मूग, शेवगा, वरण-भात, मोड आलेल्या मटकीची उसळ, अंडा पुलाव, गोड खिचडी/नाचणी सत्त्व यांचा समावेश आहे.
- कोणता खाद्यपदार्थ कसा शिजचावा, याच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत. त्यानुसार खाद्य पदार्थ बनवावा लागेल.
साखरेसाठी लोकसहभाग
- अंडा पुलाव व गोड खिचडी/नाचणी सत्त्व हे एकमेकांना पर्याय आहेत. गोड खिचडी बनविण्यासाठी आवश्यक असलेली साखर लोकसहभागातून गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- त्यामुळे शिक्षकांना पुन्हा लोकवर्गणीसाठी प्रयत्न करावा लागेल. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे.
समिती ठरविणार पाककृतीचा दिवसजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती कोणत्या दिवशी कोणते व्यंजन शिजवायचे, याचा निर्णय घेईल. तसेच वेळापत्रक सर्व शाळांना दिले जाईल. त्याचे पालन करणे प्रत्येकाला बंधनकारक राहणार आहे
"पाककृतीत केलेला बदल निश्चितच स्वागतार्ह आहे. यामुळे शालेय पोषण आहार चविष्ट होण्यास मदत होईल. मात्र, खीर बनविण्यासाठी शासनाने साखरही देण्याची गरज आहे."- पुंडलिक देशमुख, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती संघटना