दिलीप दहेलकर लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयातील व विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना आजही शेकडो किलोमीटर दूर असलेल्या नागपूर येथील सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. व विशेष म्हणजे सिरोंचा तालुक्यातील महाविद्यालयातील लिपिकांना विविध शैक्षणिक कामासाठी ४०० किमी अंतर कापून नागपूरला जावे लागते. त्यातल्या त्यात अंतर जास्त असल्याने एका दिवसात परत अहेरी उपविभागात जाणे कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही.
आदिवासी बहूल अतिदुर्गम भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा प्रवाह तयार करून उच्च शिक्षणाचा मार्ग मिळावा, त्यांच्या गरजा व सोयींचा स्तर उंचावण्यासाठी म्हणून गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. गोंडवाना विद्यापीठाच्या स्थापनेमुळे गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागातील आदिवासीबांधवांच्या मुला-मुलींना उच्च शिक्षण घेता येणे सोईस्कर झाले. मात्र, सहसंचालक कार्यालय नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.
दोन्ही जिल्ह्यांना अडसरचंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यातील महाविद्यालयात कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामासाठी नागपूर येथील सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालयात जावे लागते. गडचिरोलीत विद्यापीठ होऊनही नागपूरच्या चकरा कायमच आहेत.
आश्वासन हवेत, कार्यवाही पडली थंडबस्त्यात
- राज्याचे तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सोना शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालयाची गडचिरोली येथे निर्मिती करण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने बरीच कार्यवाहीसुद्धा पूर्ण झाली होती.
- परंतु कालांतराने आश्वासन आणि कार्यवाही थंड बस्त्यात पडल्यामुळे गडचिरोली येथे सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालय निर्मिती होण्याच्या पूर्ण आशा मावळल्या गेल्या आहेत. याकडे राज्य शासनासह लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आहे.
दीड वर्षातच गुंडाळली गडचिरोलीतील सेवाकोराना संकटाचा कालावधी संपल्यानंतर गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालयीन कामकाजाची सुविधा करून देण्यात आली होती. महिन्यातून एक दिवस नागपूर कार्यालयातील सहसंचालक व दोन ते तीन कर्मचारी गडचिरोली येथे येऊन कॉलेजची प्रशासकीय कामे करीत होती. मात्र सहसंचालक कार्यालयाने केवळ दीड वर्षांत सदर अस्थायी कार्यालय गुंडाळले. आता नागपूरवरून कुणीही अधिकारी व कर्मचारी येथे येत नाही. त्यामुळे लिपिकांना नागपूरला जावे लागते.