गडचिरोली : अभिनव उपक्रमांसाठी सतत चर्चेत असलेल्या गडचिरोली शहरातील जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा रामनगरच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात सर्पगंधा, शतावरी, कोरपड, रिठा या वनौषधीची लागवड केली आहे. शाळेच्या या उपक्रमाची पालक व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी कौतुक केले.विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व कळावे, त्याचबरोबर वनौषधीच्या वृक्षांची माहिती कळावी, या हेतूने मुख्याध्यापक सुधीर गोहणे यांच्या संकल्पनेतून शाळेच्या आवारात ५० चौ. फूट जागेत कोरपडची लागवड करण्यात आली. या झाडांची शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी योग्य देखभाल केली. आयुर्वेदाचार्य डॉ. प्रशांत भरणे यांनी शाळेला भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी सदर कोरपड गडचिरोली उप वनसंरक्षक कार्यालयामध्ये निर्माण करण्यात आलेल्या गोंडवाना हर्ब येथे विकण्याचा सल्ला दिला. त्यानुसार विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनात उद्यानातील कोरपड गोंडवाना हर्ब येथे नेऊन १० रूपये प्रतिकिलो दराने विकली. यातून शाळेला ८०० रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. शाळेमध्ये इतरही प्रकारची वनौषधी असून सदर वनौषधी विकून उत्पन्न प्राप्त करण्याचा स्त्रोत शाळेला प्राप्त झाला आहे. या पैशातून विद्यार्थ्यांकरिता शाळेत अत्याधुनिक सोयीसुविधा पुरविता येणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर कमी जागेत कमी पाण्याचा वापर करून उत्पन्न कसे मिळवायचे याचेही धडे या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. ही अभिनव संकल्पना मुख्याध्यापक सुधीर गोहणे, महेंद्र शेडमाके, रवींद्र गंदेवार यांच्या कल्पनेतून साकारली आहे. या उद्यानाला गडचिरोलीच्या उप वनसंरक्षक लक्ष्मी अनबतुल्ला, वन परिक्षेत्राधिकारी चांदेवार, प्रिया तायडे यांनी भेट दिली. या शाळेचा आदर्श इतर शाळांनी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी फुलविले वनौषधीचे उद्यान
By admin | Updated: January 29, 2015 23:07 IST