गडचिरोली : बुधवारी रात्री गडचिरोलीसह जिल्हाभरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने गडचिरोली, चामोशी, देसाईगंज, धानोरा, घोट आदी भागात मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे विजेचे खांब कोसळून पडले असून अनेक घरांचे, शाळांचे, गोठ्यांचे टिनपत्रे उडून गेले आहेत. गुरूवारी दिवसभर महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम करीत होते. गडचिरोली शहरातही महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मध्यरात्रीपासूनच वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी काम सुरू केले होते. \चामोर्शी शहरासह परिसरात मेघगर्जनांसह पाऊस झाला. बुधवारी रात्री १० वाजता चामोर्शी भागात पावसाला सुरूवात झाली. शहरातील मूल मार्गावरील गांधी यांच्या गोडावूनचे टिनपत्र्याचे छत उडून गेले. तसेच आश्रमशाळांच्या कॉम्प्युटर रूमचे वरचे छत कोसळून पडले. माता मंदिराजवळ एक झाड तुटून पडले. नुतन शाळा येथील एक झाड इमारतीवर कोसळले. घोट भागालाही मोठ्या प्रमाणावर वादळाचा तडाखा बसला. वरूर येथील नरेश पुगलिया हायस्कूलचे टिनपत्रे वादळामुळे उडून गेले आहे. धानोरा परिसरात अकाली पावसाने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुसावंडी येथील देविदास बग्गुजी दुगा यांचे घरावरील पत्रे पुर्णत: उडून गेलेत. घरातील धान व कटान माल भिजला. त्यांचे ८० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. देविदास दुगा यांच्याही घराचे नुकसान झाले. देसाईगंज तालुक्यात सायंकाळी ७ ते रात्री ११ वाजता वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने किन्हाळा, मोहटोला, डोंगरगाव (हलबी), रिठचिखली, विहीरगाव, पोटगाव, कोकडी, तुळशी, विसोरा, शंकरपूर या परिसरातील घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. नागरिकांचे नुकसानही झाले आहे. या गारपीटामुळे घराचे टिनपत्रे उडून गेले. मुखरूजी पत्रे, प्रमोद झिंगरपत्रे यांचे टिनचे शेड उडून गेले. मालाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. मोहटोला, रिठ येथील गावातील विद्युत खांब तुटून पडले असून या भागात संत्राएवढी गार झाल्याने कौलारू घरे, शेतातील पिकाचे नुकसान झाले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
वादळाचा जिल्ह्याला प्रचंड तडाखा
By admin | Updated: April 29, 2016 01:33 IST