गडचिरोली : वनविभागाकडून वनतस्करांवर आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात असले तरी अजुनपर्यंत याला यश प्राप्त झाले नाही. सहा महिन्यात सुमारे ११ हजार ४४९ झाडांची तोड करण्यात आली आहे. याच सहा महिन्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व फिरत्या पथकांनी वनतस्करांकडून सुमारे १२ लाख ४६ हजार ३५५ रूपयांचा माल जप्त केला आहे. एकुण १ हजार ७८४ वनगुन्हे घडले आहेत. यावरून जंगलतोड किती मोठ्या प्रमाणात सुरू आहे, हे लक्षात येते. महत्त्वाचे म्हणजे, सर्वात जास्त वृक्षतोड गडचिरोली वनविभागात झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण भूभागाच्या सुमारे ७८ टक्के भूभाग जंगलांने व्यापला आहे. यातील बहुतांश जंगल आरक्षित आहे. जंगलाचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र वनवृत्त कार्यालय, ५ विभागीय कार्यालय व हजारो वनकर्मचारी कार्यरत आहेत. पाचही वनविभागात स्वतंत्र फिरते पथक स्थापन करण्यात आले आहेत. या पथकाच्या माध्यमातून संपूर्ण जंगल परिसरात रात्रंदिवस कडक पहारा ठेवला जातो. स्थानिक नागरिकांच्या सहकार्याशिवाय वनांचे संरक्षण करणे, शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर राज्य शासनाने संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची स्थापना केली आहे. या वनसमित्यांच्या सदस्यांना वनविभागाकडून जंगलाच्या माध्यमातून रोजागाराचे साधन पूरविले जातात. त्याचबरोबर गावकऱ्यांकडून जंगल कटाई होऊ नये यासाठी गावकऱ्यांना गॅसचे वाटपही करण्यात येत आहे. वनविभागाने वनकर्मचाऱ्यांना पेट्रोलिंगसाठी ४३ मोटारसायकल, हजारो मोबाईल पुरविले आहेत. या सर्व उपाययोजना करूनही जंगलतोडीवर नियंत्रण मिळविण्यात वनविभागाला पूर्णपणे यश प्राप्त झालेले नाही. १ जानेवारी ते ३० जून या सहा महिन्यात सुमारे ११ हजार ४४९ झाडांची तोड करण्यात आली आहे. यामुळे शासनाचे सुमारे १ कोटी १७ लाख ५९ हजार ११९ रूपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी १२ लाख ४६ हजार ३५५ रूपये किंमतीचा माल वनतस्कारांकडून हस्तगत केला आहे. सहा महिन्यात एकुण १ हजार ७८४ वनगुन्हे घडले आहेत. सिरोंचा तालुक्यातून सर्वात जास्त वनतस्करी होत असल्याने या विभागात सर्वाधिक वृक्षतोड होत असल्याचा आरोप होत असला तरी प्रत्यक्षात सर्वाधिक वृक्षतोड मात्र गडचिरोली वनविभागात झाली आहे. यावरून या विभागातील कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. (नगर प्रतिनिधी)
जंगलतोड सुरूच
By admin | Updated: August 17, 2014 23:10 IST