लाेकमत न्यूज नेटवर्क
मार्कंडादेव : काेराेनाची टाळेबंदी शिथील झाली असून, माॅल, सिनेमागृहे व शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, वरिष्ठ महाविद्यालये अजूनही सुरू झाले नाहीत. ही महाविद्यालयाचे सुरू करून चामाेर्शी तालुक्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाची व्यवस्था करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा, चामाेर्शीच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात अभाविपच्या शिष्टमंडळाने राज्याचे नगरविकास मंत्री तथा गडचिराेलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची मार्कंडा तीर्थस्थळी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. याप्रसंगी अभाविपचे नगरमंत्री अंकित चलाख, भाग संयाेजक यश गण्यार पवार, महाविद्यालय प्रमुख अक्षय चलाख, नगरसह मंत्री कार्तिक पाऊलबुद्धे, उज्ज्वला पेशट्टीवार, विद्यार्थिनी प्रमुख रेणुका बाेडगेवार, जिल्हा संघटनमंत्री शक्ती केराम आदी उपस्थित हाेते.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह तयार करण्यात यावे. चामाेर्शी तालुक्यातील विद्यार्थ्यांना क्रीडांगण नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. येथे क्रीडांगणाची व्यवस्था करावी, प्रवाशांसाठी चामाेर्शी येथे प्रशस्त बसस्थानकाचे काम सुरू करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.