उद्योगमंत्र्यांकडे साकडे : सेना पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदनगडचिरोली : अविकसित अतिदुर्गम नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात एकही मोठा उद्योग स्थापन न झाल्याने जिल्ह्याचा विकास रखडला असून बेरोजगारांची मोठी फौज तयार झाली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात लोहपोलाद, सिमेंट तसेच इतर उद्योग प्रकल्प सुरू करण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यासंदर्भात शिवसेनेचे गडचिरोली उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात सेना पदाधिकाऱ्यांनी अधिवेशन काळात नागपूर येथे जाऊन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. यावेळी मंत्रीमहोदय व सेनापदाधिकाऱ्यांमध्ये उद्योग निर्मितीबाबत सखोल चर्चा झाली. यावर उद्योगमंत्री देसाई यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या उद्योग प्रकल्पाबाबत मुंबईच्या मंत्रालयात लवकरच महत्त्वाची बैठक बोलावून तत्काळ निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन सेना पदाधिकाऱ्यांना यावेळी दिले. दिलेल्या निवेदनात सूरजागड येथे लोह प्रकल्प उभारण्यात यावा, देवलमरी येथे सिमेंट कारखाना सुरू करावा, वनोपजावर प्रक्रिया करणारे केंद्र स्थापन करण्यात यावे, मधसंकलन केंद्र उभारावे, एमआयडीसी क्षेत्राचा विकास करावा, एमआयडीसी क्षेत्रात उद्योग न उभारल्यामुळे रिकामे असलेले भूखंड शासनाने परत घेऊन ते बेरोजगारांना देण्यात यावे, खनिजाचे उत्खनन करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे. भेटी दरम्यान शिवसेनेचे उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर बघमारे, विभाग प्रमुख गजानन नैताम, संदीप दुधबळे, गडचिरोली तालुका प्रमुख घनश्याम कोलते, दिलीप भोयर, राजू विरवार, यादव लोहंबरे, सुनील नक्षिणे, योगेश कुळवे, राहुल सोरते, देवेंद्र मोगरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात उद्योग प्रकल्प सुरू करा
By admin | Updated: December 25, 2015 02:14 IST