जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : पालकांची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : चामोर्शी तालुक्यातील महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून आष्टी गावाची ओळख आहे. आष्टी येथे ग्रामीण भागातून विद्यार्थी शिक्षण घेण्याकरिता येतात. परंतु आष्टी येथे ये-जा करण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होतात. त्यामुळे आष्टी येथून ग्रामीण भागासाठी मानव विकास मिशनची बससेवा सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. आष्टी येथे तीन हायस्कूल, पाच उच्च प्राथमिक शाळा, तीन कनिष्ठ महाविद्यालये आहेत. आष्टी परिसरातील शेकडो विद्यार्थी आष्टी येथे शिक्षण घेण्याकरिता येतात. आष्टी-आलापल्ली मार्गावरील चंदनखेडी, रामनगट्टा फाटा, चौडमपल्ली ही गावे येतात. आष्टी-चपराळा मार्गावर इल्लूर, ठाकरी, कुनघाडा, चपराळा आदी गावे येतात. आष्टी-गोंडपिपरी मार्गावर तारसा, विठ्ठलवाडा, आष्टी-चामोर्शी मार्गावर अनखोडा, उमरी, कोनसरी, रामकृष्णपूर, आष्टी घोट मार्गावर मार्र्कंडा कं., बामनपेठ, अडपल्ली, मलेझरी आदी गावे येतात. या गावातील विद्यार्थी आष्टी येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यामुळे या संपूर्ण मार्गावर सकाळी येण्यासाठीसकाळी ७ व १०.३० व जाण्यासाठी सकाळी ११.३० व सायंकाळी ५.१५ वाजताची बससेवा सुरू करावी, अशी मागणी परिसरातील पालकांनी महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलच्या मुख्याध्यापकांच्या मार्फतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आष्टी परिसरात मानव विकास मिशनची बस सुरू करा
By admin | Updated: July 1, 2017 01:31 IST