लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात वन्यप्राणी व मानव संघर्षावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. घनदाट जंगलात वाघांचा मुक्त वावर आहे. अनेकदा शेतात कामानिमित्त गेलेल्यांवर वाघ हल्ले करतात. यात निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागतो. फेब्रुवारीमध्ये चामोर्शी तालुक्यातील गणपूर (रै.) येथे वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी व्याघ्रहल्ले रोखण्यासाठी तीन महिन्यांत आराखडा तयार करा, असे निर्देश दिले. शिवाय पाच वर्षांत व्याघ्रहल्ल्यांत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना विशेष भरपाई देण्याचे आदेशही त्यांनी दिले.
मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर परदेशी यांनी २२ मार्च रोजी नागपुरात वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजनांवर चर्चा केली व त्यावर तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. गडचिरोली, चार्मोशी, आरमोरी, वडसा आणि धानोरा क्षेत्रांत वाघांच्या हल्ल्याच्या घटना अधिक घडल्या. या विषयावर काम करणाऱ्या वाइल्ड लाईफ इन्स्टिट्यूट सारख्या संस्थांच्या तज्ज्ञांची नेमणूक करण्यात येणार आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थितीया बैठकीस राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) शोमिता बिस्वास, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक डॉ. रामचंद्र रामगावकर, गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक एस. रमेशकुमार उपस्थित होते.
वयस्क वाघांपासून धोका अधिकमानव आणि वन्यजीव संघर्षात आढळणारे वाघ हे वयस्कर असल्याचे दिसून येते. यासंदर्भात उपाययोजनांवर बैठकीत चर्चा झाली. नरभक्षक वयस्क वाघांना जेरबंद करण्याऐवजी त्यांचे स्थलांतर करणे योग्य असल्याचे मत यावेळी तज्ज्ञांनी व्यक्त केले.
३ महिन्यांत अतिरिक्त वाघांचे होणार जिल्ह्याबाहेर स्थलांतरअतिरिक्त वाघांबाबत परिस्थितीचे अवलोकन करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. याचा आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
जिल्ह्यात राबविल्या जाणार या उपाययोजना....
- चपराळा व प्राणहिता अभयारण्यांत सागवान झाडांचे विरळीकरण करणे व कुरणाचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय झाला. जेणेकरून तृणभक्षी प्राण्याची संख्या वाढून मांसभक्षी प्राण्यांना खाद्य मिळेल. प्रत्येक गावात पोलिस पाटील यांच्या धर्तीवर वनपाटील नेमण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.
- स्थानिकांना जंगलात लाकूड, सरपण गोळा करण्यासाठी जंगलात जावे लागू नये यासाठी गावामध्ये पाइपलाइनद्वारे सीबीजी गॅसपुरवठा करण्यासाठी ग्रामस्थांच्या शेतात गवत उत्पादन करून त्याचा उपयोग सीबीजीसाठी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यासाठी सीबीजी गॅस प्लांट उभारण्याचेही ठरविण्यात आले.
- वन्यप्राण्यांमुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई लवकर देण्यासाठी ई-पंचनामा करणे, वाघांची वाढती संख्या लक्षात घेऊन चपराळा अभयारण्यातील सहा गावांच्या स्थलांतरासाठी स्थानिकांचे सामाजिक, आर्थिक मूल्यांकन, पुनर्वसनासाठी नव्या जागेचा शोध घेणे, आदी उपाययोजना राबविण्याचा निर्णय बैठकीत घेतला.