७०९१.८० हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 04:05 AM2021-01-05T04:05:42+5:302021-01-05T04:05:42+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : मागील वर्षी आरमोरी तालुक्यात रब्बी हंगामात ४७६६.३० हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकाची प्रत्यक्ष ...

Sowing of rabi crops in an area of 7091.80 hectares | ७०९१.८० हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची पेरणी

७०९१.८० हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची पेरणी

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

आरमोरी : मागील वर्षी आरमोरी तालुक्यात रब्बी हंगामात ४७६६.३० हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकाची प्रत्यक्ष पेरणी झाली होती. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले धानपिकाचे नुकसान, जमिनीत असलेला ओलावा व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने केलेले रब्बीचे नियोजन यामुळे यावर्षी शेतकरी रब्बी पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळला असून, आरमोरी तालुक्यात रब्बीचे क्षेत्र मागील वर्षाच्या तुलनेत दीड पटीने वाढले आहे. यावर्षी ७०९१.८० हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची पेरणी झाली आहे.

यावर्षी आरमोरी तालुक्यात २९०५.१० हेक्टर या सर्वसाधारण क्षेत्रापैकी ७०९१.८० हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकाची पेरणी झाली आहे. आरमोरी तालुक्यात आरमोरी, वैरागड, देऊळगाव, पिसेवडधा हे चार महसूल मंडल येतात. यामध्ये प्रामुख्याने आरमोरी महसूल मंडलात १९९२.०० हेक्टर, वैरागड महसूल मंडलात २१३५.३० हेक्टर, देऊळगाव महसूल मंडलात १६३५.७० हेक्टर, तर पिसेवडधा महसूल मंडलात १३२८.८० हेक्टर अशा प्रकारे आरमोरी तालुक्यातील एकूण ७०९१.८० हेक्टरमध्ये रब्बी पिकाची लागवड झाली आहे. आरमोरी तालुक्यात यावर्षीच्या खरीप हंगामात चांगल्या प्रकारे पाऊस झाल्याने अनेक तलावात पाणीसाठा मुबलक प्रमाणात आहे. तसेच जलयुक्त शिवारची कामेही बऱ्यापैकी झाली आहेत. जमिनीत मोठ्या प्रमाणात ओलावा आहे. तसेच सिंचन विहिरींची संख्याही वाढल्यामुळे रब्बी पीक घेण्याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे. त्यातच कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी गावागावात शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना प्रोत्साहित करीत रब्बी पीक घेण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. त्यामुळेच मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी रब्बी पिकाचे क्षेत्र वाढले आहे.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने तालुक्यातील विविध गावांमध्ये रब्बीचे प्रात्यक्षिक घेतले. एकूण १२ प्रकल्प निवडून एका प्रकल्पात २५ एकर शेती निवडून एकरी एक शेतकरी याप्रमाणे २५ शेतकऱ्यांना एकरी २० किलो याप्रमाणे हरभरा पिकाचे बियाणे १२ गावात वितरित करण्यात आले. त्यामुळे यावर्षी रब्बी हंगामात हरभरा पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.

आरमोरी तालुक्यातील एकूण १६ गावात कृषी विभागाच्या वतीने रब्बीच्या शेतीशाळा घेण्यात येणार असून, कृषी अधिकारी व कर्मचारी हे पिकाचे संगोपन व रोगराई टाळून रब्बीचे उत्पादन कसे वाढविता येइल, याविषयी शेतीशाळेतून मार्गदर्शन करणार आहेत.

बाॅक्स

१९४ हेक्टर क्षेत्रावर गहू

आरमोरी तालुक्यात गहू पिकाची पेरणी १९४ हेक्टर, हरभरा १२९४ हेक्टर, लाखोळी १२८० हेक्टर, जवस ६४८ हेक्टर, भुईमूग २३५.६० हेक्टर, मोहरी ६३ हेक्टर, मका ५९८ हेक्टर व बाकी क्षेत्रात मूग, पोपट, कुरता, उडीद, वाटाणा, बरबटी, मसूर, चवळी या कडधान्याची व भाजीपाला आणि मसालेदार पदार्थांची प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली आहे.

मका पिकाकडे वाढला कल

आरमोरी तालुक्यात गेल्या तीन - चार वर्षांपासून मका पिकाची पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. मागील वर्षी १४५.३ हेक्टर क्षेत्रात मका पिकाची लागवड करण्यात आली. मात्र, यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत चार पटीने मक्याचे क्षेत्र वाढलेले आहे. यावर्षी ५९८.० हेक्टर क्षेत्रात मक्याची प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. तालुक्यातील देवीपूर व शंकरनगर या बंगाली बांधवांच्या गावात सर्वाधिक मक्याची लागवड झाली आहे. त्यासह डोंगरसावंगी, पाथरगोटा, देऊळगाव व इतर गावात मक्याचे क्षेत्र वाढलेले आहे.

Web Title: Sowing of rabi crops in an area of 7091.80 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.