दिगांबर जवादे गडचिरोलीजमीन, घर यांच्या तुलनेत सोने तारण म्हणून बँकेकडे गहाण ठेवल्यानंतर तत्काळ कर्ज उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचाही सोने गहाण ठेवून कर्ज काढण्याकडे ओढा असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील सर्वच बँकांमध्ये सुमारे २० कोटी रूपयापेक्षा जास्त किंमतीचे शेतकऱ्यांचे सोने यावर्षी गहाण ठेवण्यात आले आहे. बँकेकडून कर्ज घेतांना प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मालकीची जमीन, घर किंवा इतर मालमत्ता गहाण ठेवावी लागते. मात्र या मालमत्ता गहाण ठेवतेवेळी अनेक दाखले जोडावे लागतात. हे सर्व दाखले गोळा करतांना नागरिकांची चांगलीच दमछाक उडते. कर्ज घेण्याच्या पूर्वीच हजारो रूपये खर्च होतात. शेतकरी कर्ज बुडवतो, अशी चुकीची धारणा बँक कर्मचाऱ्यांची झाली असल्याने डझनावारी दाखले जोडूनही कर्ज मंजूर होईलच याची शाश्वती राहत नाही. बऱ्याचवेळा कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवूनही सर्वसामान्य नागरिक व शेतकरी त्रस्त होतो.भारतीय नागरिकांना सोन्याचे पुरातन काळापासूनच विशेष आकर्षण असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या घरी काहीनाकाही प्रमाणात सोने आहे. महिलेच्या शरीराची शोभा वाढविणारे सोन्याला संकटकाळी गहाण ठेवल्यानंतर सावकर तत्काळ कर्ज उपलब्ध करून देत असल्याने सोन्याला संकटमोचक अशीही उपमा दिली जाते. जवळपास सर्वच राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सोन्याच्या तारणावर कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध आहे. बऱ्याच बँकांमध्ये सोनाराच्या माध्यमातून सोन्याची शुद्धता तपासल्यानंतर कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये १० ते १५ दिवसाचा कालावधी लागतो. त्याचबरोबर मध्यस्थी म्हणून सोनार काम करीत असल्याने त्याला काही प्रमाणात दलालीही द्यावी लागते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गोल्ड प्युरिटी एनालायजर मशीन खरेदी केली आहे. या मशीनच्या माध्यमातून सोन्याची शुद्धता एका मिनिटात तपासली जाते. त्यानंतर सोन्याच्या किंमतीच्या ७५ टक्के कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यासाठी केवळ दोन फोटो व ओळखपत्राची गरज आहे. त्यानंतर ग्राहकाला केवळ अर्ध्या तासातच कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते. एकट्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सुमारे ४ हजार शेतकऱ्यांनी १५ कोटी रूपयाचे सोने गहाण ठेवले आहे. यावर १० कोटी रूपयाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. सर्वच राष्ट्रीकृत बँकांचा विचार केला तर हा आकडा २० कोटींपेक्षा जास्त आहे. जून महिन्यापासून शेतीचा हंगाम सुरू होत असल्याने जून व जुलै या दोन महिन्यात सोने गहाण ठेवण्याचे प्रमाण वाढते. सोने तारणावर कर्जाची मर्यादा एक वर्षाची असली तरी जेवढे दिवस कर्ज वापरले जाते, तेवढ्याच दिवसाचे व्याज आकारले जात असल्याने ग्राहकालाही ते परवडणारे असल्याने कर्ज घेण्याचे प्रमाण वाढत आहे.
तारण म्हणून सोन्याला पसंती
By admin | Updated: July 12, 2014 01:13 IST