गडचिरोली : शहरानजीकच्या कनेरी येथील वायुनंदना पॉवर लिमिटेडमधील कंत्राटी व स्थायी कामगार विविध २५ मागण्यांना घेऊन २४ आॅगस्टपासून कामबंद आंदोलनावर आहेत. कामगारांच्या मागण्या रास्त असून या मागण्या त्वरित सोडवाव्या व कामगारांना न्याय द्यावा. येत्या तीन दिवसात वायुनंदनातील कामगारांच्या वेतनासह इतर समस्या न सोडविल्यास शिवेसनेच्या वतीने वायुनंदनाला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी कामगारांच्या भेटीदरम्यान वायुनंदना व्यवस्थापनाला दिला आहे. आस्थापनेतील कामगारांना कायम करण्यात यावे, सर्व कामगारांना प्रत्येक महिन्याच्या १ ते ७ या तारखेपर्यंत राष्ट्रीयकृत बँकेमार्फत वेतन देण्यात यावे, सोबत वेतनपत्रक व हजेरी पत्रक देण्यात यावे, आस्थापनेतील कुशल कामगारांना १५ हजार, अर्धकुशल कामगारांना १३ हजार व अकुशल कामगारांना ११ हजार रूपये प्रति महिना देण्यात यावे, सर्व कामगारांना आस्थापनेचे ओळखपत्र द्यावे, राष्ट्रीय सण व धार्मिक सुट्यांकरिता प्रत्येक वर्षासाठी २० सार्वजनिक सुट्या देण्यात यावे, सर्व सभासद कामगारांना आठवड्यातून भर पगारी सुटी देण्यात यावी, सर्व कामगारांच्या मुलांना उत्तम शिक्षण घेण्याकरिता त्यांच्या मासिक वेतनात १ हजार रूपये शैक्षणिक भत्ता म्हणून वाढ करावी, अशी मागणी वायुनंदाना मजदूर कामगार संघटनेच्यावतीने वायुनंदनाच्या व्यवस्थापकांकडे निवेदनातून करण्यात आली होती. परंतु कामगारांच्या मागणीकडे व्यवस्थानाने पूर्णत: दुर्लक्ष केले. त्यामुळे २४ आॅगस्टपासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनाला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली व व्यवस्थापनाशी कामगारांच्या समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार, राजु कावळे, गजानन नैताम, सुधाकर पेटकर, योगेश कुळवे, ज्ञानेश्वर बगमारे, संदीप दुधबळे, धनंजय कुळवे, मोरेश्वर वाघरे, राकेश म्हस्के, कैलाश चौधरी, नरेंद्र गावतुरे, माणिक राऊत, टिकाराम झंझाळ उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
तीन दिवसांत कामगारांचे प्रश्न सोडवा
By admin | Updated: August 28, 2014 23:48 IST