गडचिरोली : रेती घाटातून अवैध रेतीची वाहतूक केल्यास महसूल विभागाचे अधिकारी जबर दंड ठोठावत असल्याने ट्रॅक्टरमालक रेतीची वाहतूक करण्यास पुढे येत नाही. याचा फायदा घेत गडचिरोली येथील काही नागरिक बैलबंडीने कठाणी नदीतून सकाळी व सायंकाळच्या सुमारास रेतीची तस्करी करीत आहेत. मात्र याकडे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. रेती घाटांचा लिलाव होण्यास आणखी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र मागील एक महिन्यापासून पावसाने उसंत घेतली असल्याने नदीपात्र रिकामे झाले आहे. त्यामुळे यातून रेती काढणे शक्य होत आहे. मात्र अजूनपर्यंत रेती घाटांचा लिलाव झाला नाही. लिलाव झाला नसतांना ट्रॅक्टरद्वारे रेतीची वाहतूक करतेवेळी आढळून आल्यास महसूल विभागाचे अधिकारी हजारोंच्या घरात आर्थिक दंड ठोठावतात. त्यामुळे ट्रॅक्टरमालक रेतीची तस्करी करण्यास धजावत नसल्याचे दिसून येते. उन्हाळ्यामध्ये शहरात प्रचंड पाण्याची व मजूरांची टंचाई भासते. त्यामुळे काही नागरिक पावसाळा किंवा हिवाळ्यात बांधकाम करतात. बांधकामासाठी रेती हा आवश्यक घटक आहे. काही कंत्राटदारांनी शहरात रेती साठवून ठेवली आहे. मात्र सदर कंत्राटदार जादा भावाने रेतीची विक्री करीत असल्याने बांधकाम करणारे व्यावसायिक व नागरिक त्यांच्याकडून रेती घेण्यास तयार होत नाही. याचा फायदा शहरातील बैलबंडीधारकांनी उचलणे सुरू केले आहे. शहरातील जवळपास १० ते १५ बैलबंडीधारक बैलबंडीने रेतीची तस्करी करीत आहेत. सदर नागरिक पहाटेच्या सुमारास नदीघाटावरून जवळपास १० वाजेपर्यंत रेतीची वाहतूक करतात. कठाणी नदी शहरापासून केवळ दोन किमी अंतरावर आहे. दिवसाच्या चार ते पाच बंडी रेती आणली जात आहे. शहरवासीयांना प्रती बंडी ३०० रूपये दराने रेती विकली जात आहे. यातून ते दिवसाकाठी १ हजार ते १ हजार ५०० रूपये दिवसाला कमावित आहेत. बैलबंडीच्या साहाय्याने केवळ घरेलू उपयोगासाठी सदर नागरिक रेती नेत असावे हे गृहित धरून रस्त्यावरून ये- जा करणारे नागरिक याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांच्या विषयीची तक्रार महसूल किंवा खनिकर्म विभागाकडे करीत नाही. मात्र सदर नागरिक मागील दोन वर्षांपासून रेतीची तस्करी करीत आहेत. मात्र अजूनपर्यंत एकाही बैलबंडीधारकावर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांची हिंमत आणखी वाढत चालली असून दिवसेंदिवस बैलबंड्यांची संख्याही वाढत जात आहे. काही नागरिकांचा पैसे कमाविण्याचा हा मार्ग बनला आहे. त्यामुळे सदर बैलबंडीधारकांवर महसूल व खनिकर्म विभागाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (नगर प्रतिनिधी)
कठाणी नदीतून बंडीद्वारे रेतीची तस्करी
By admin | Updated: October 15, 2014 23:17 IST