देसाईगंज पोलिसांचा कार्यक्रम : योजनांची दिली माहिती
देसाईगंज : पोलीस स्टेशन देसाईगंजच्या वतीने बोडधा येथे बुधवारी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला परिसरातील महिलांनी लक्षणीय प्रमाणात उपस्थिती दर्शविली. मेळाव्यादरम्यान नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. मेळाव्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील होते. उपाध्यक्ष म्हणून सहायक पोलीस निरीक्षक महेश मांडवे तर प्रमुख अतिथी म्हणून मडावी, संवर्ग विकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे, सहायक पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस उपनिरीक्षक पठाण, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भागडकर, सरपंच रिना मेश्राम, पोलीस पाटील काशिनाथ गायकवाड, बोडधाचे उपसरपंच मोहन गायकवाड, तंटामुक्त समिती अध्यक्ष पुरूषोत्तम गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.जनजागरण मेळाव्यादरम्यान विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली. मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी पोलीस व जनता यांचे अतुट नाते आहे. जनतेच्या संरक्षणासाठी पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस विभाग आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत आहे. त्याला नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक व आभार मांडवे यांनी मानले. संचालन चुन्ने यांनी केले. कार्यक्रमाला दीड हजार नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)