गडचिरोली : विदर्भ आॅटो रिक्षा चालक फेडरेशन व राज्य आॅटो रिक्षा संघटना कृती समितीच्या आवाहनानुसार आॅटोरिक्षा चालक मालक संघटना गडचिरोलीच्या वतीने गुरूवारी बंद पुकारण्यात आला. या बंदमध्ये शहरातील सर्वच आॅटोरिक्षा चालक व मालकांनी सहभाग नोंदविला. बंद आंदोलनामुळे दिवसभर आॅटोरिक्षा वाहतूक बंद ठेवण्यात आल्यामुळे प्रवाशांची चांगलीच पंचाईत झाली.आॅटोरिक्षा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये राज्य सरकारने नेमलेल्या अभ्यास समितीने कल्याणकारी मंडळाचे प्रारूप, अहवाल शासनाला जानेवारी २०१४ मध्ये सादर केला आहे. या प्रमाणे सदर मंडळ अस्तित्वात आल्यास सरकारला एक रूपयाचाही खर्च न करता आॅटोरिक्षा चालकांसाठी पेन्शन, विमा, आरोग्य योजना, मुलांच्या शिक्षणासाठी मदत आदी कल्याणकारी लागू करता येऊ शकतात. मात्र शासनाने हा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित ठेवला आहे, असेही आॅटोरिक्षा चालक-मालक संघटनेने म्हटले आहे. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष अविनाश आत्राम, उपाध्यक्ष विजय कृपाकर, न.प. सभापती संजय मेश्राम, रूपराज वाकोडे, नारायण खोब्रागडे, फारूख शेख, राम तिवाडे, अरूण बनकर, किरण मोहुर्ले आदीसह आॅटो चालक-मालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आॅटोरिक्षा चालकांचा बंद
By admin | Updated: May 1, 2015 01:24 IST