गडचिरोली : भारतीय जनता पक्षाला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यात अभूतपूर्व यश मिळाले आहे. भाजपच्या या यशामुळे इतर पक्षांची पूर्णत: दाणादाण उडून गेली. या पार्श्वभूमीवर आगामी काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या प्रमुख पक्षांमध्ये संघटन पातळीवर व्यापक फेरबदल होण्याचे संकेत मिळू लागले आहे. गडचिरोली जिल्ह्यात २००९ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रचंड यश लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मिळविले होते. पक्षाचे त्यावेळी खासदार व दोन मतदार संघात आमदारही निवडून आले होते. तत्कालीन राज्यमंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात या निवडणुका लढविल्या गेल्या होत्या. त्यांनीच जिल्ह्यात काँग्रेसच्या यशासाठी फौजफाटा कामी लावून पक्षाला हे यश मिळवून दिले होते. त्यानंतर मात्र तत्कालीन खासदार मारोतराव कोवासे व विजय वडेट्टीवार यांच्यात वितृष्ठ आले. कालांतराने अनेक घटनाक्रम घडत गेले. वडेट्टीवारांच्या मंत्रीपदालाही कोवासेंनी विरोध केला. गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी मोठी मोर्चेबांधणी करण्यात आली होती. मात्र त्यावेळी कोवासे समर्थक असलेल्या हसनअली गिलानींची निवड करण्यात आली. गिलानी कोवासेंपासून दूर झाले व वडेट्टीवार, उसेंडी यांच्या जवळ गेले. लोकसभेत यावेळी काँग्रेसचा दारूण पराभव झाला. विधानसभा निवडणुकीतही आरमोरी वगळता अहेरी व गडचिरोली मतदार संघात काँग्रेसची अनामत रक्कमही जप्त झाली. विधानसभा निवडणुकीच्या काळातच काँग्रेसमधून अरविंद पोरेड्डीवार, प्रकाश पोरेड्डीवार, प्रकाश अर्जुनवार यांच्यासह अनेक नेते, कार्यकर्ते बाहेर पडले. डॉ. नामदेव उसेंडी यांच्याकडे पक्षाचे प्रभारी जिल्हाध्यक्षपद देण्यात आले आहे. मात्र आगामी काळात ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार हे गडचिरोली मुख्यालयातच राहणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यातील काँग्रेसचे राजकारण हे त्यांच्या भोवती फिरणार आहे. पुढील दोन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे काँग्रेसची बांधणी वडेट्टीवारांच्याच नेतृत्वात होईल, असे संकेत आहे. काँग्रेस पक्षाचे सध्य:स्थितीत मारोतराव कोवासे हे एक प्रमुख नेते आहेत. मात्र ते सक्रीय राजकारणातून अलिप्त आहेत. या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन बांधणीसाठी वडेट्टीवारांवरच जबाबदारी येण्याची शक्यता आहे. दोन वर्षाने जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणुका आहेत. या अनुषंगाने काँग्रेस आता पुढची वाटचाल करेल, असे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही विधानसभा निवडणुकीत मोठी वाताहत झाली आहे. जिल्हाध्यक्ष माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचाही पराभव या निवडणुकीत झाला. गडचिरोली व आरमोरी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसची अनामत रक्कमही जप्त झाली. सध्या जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. आगामी काळात पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी पक्षाला पुन्हा प्रयत्न करावे लागणार आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार हरीराम वरखडे असतांनाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ २ हजार मतांचा टप्पा गाठता आला. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. या परिस्थितीत बाराही तालुक्यात पक्ष संघटनेची पुन्हा उभारणी हे राष्ट्रवादी काँग्रेस समोरचे सर्वात मोठे आव्हान राहणार आहे. शिवसेनेचा गड अशी आरमोरी विधानसभा क्षेत्राची ओळख होती. मात्र या निवडणुकीत आरमोरी विधानसभा क्षेत्रातच शिवसेनेचे मोठे पाणीपत झाले. गडावरच्या शिलेदाराची अनामत रक्कमही वाचविता आली नाही. शिवसेनेच्या संघटनपातळीवर मरगळ आली आहे. त्यामुळे शिवसेना संघटनेचीही पुन्हा बांधणी होण्याचे संकेत आहे. जुने शिवसैनिक असलेले प्रा. राजेश कात्रटवार यांच्याकडे गडचिरोलीसह अहेरी विधानसभा क्षेत्राची जबाबदारी जिल्हाप्रमुख म्हणून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेला आगामी काळात जिल्ह्यात मजबूत स्थान रोवायचे असल्यास पक्ष संघटनेची बांधणी नव्याने करावी लागणार आहे. यादृष्टीने विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पक्ष संघटना कामाला लागेल, असे संकेत सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिलेले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
पक्ष संघटनांमध्ये फेरबदल
By admin | Updated: October 25, 2014 01:19 IST