उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील उदनपूर व चुरसा गावातील शेकडो नागरिकांनी गडचिराेली जिल्ह्यातील सिरोंचा, आष्टी,चामोर्शी,आरमोरी, अहेरी, गडचिरोली आदी ठिकाणी आइसक्रीम व लस्सीची दुकाने लावली आहेत.
परप्रांतातून जिल्ह्यात दाखल झालेले आइसक्रीम व लस्सी विक्रेते तीन महिने व्यवसाय करुन प्रत्येकी ४० ते ५० हजार रुपयांची कमाई करतात. मागील वर्षी ते फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात दाखल झाले हाेते, परंतु कोरोनाच्या संकटामुळे मार्च महिन्यात लॉकडाऊन घाेषित झाले आणि एका महिन्यात त्यांना दुकाने गुंडाळावी लागली. जिल्हा व राज्याच्या सीमा बंद झाल्याने ते संकटात सापडले. संकटात सापडलेल्या या व्यावसायिकांना उत्तर प्रदेशात परत जाण्यासाठी बराच त्रास झाला. एवढ्या जणांना जाण्यास पास मिळत नव्हता. शेवटी कशीतरी परवानगी मिळाली व ते आपल्या गावाला परत गेले. एका वर्षानंतर परत त्या गाेष्टीला उजाळा मिळाला. मागील वर्षीची आर्थिक परिस्थिती फार बिकट होती, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.