आरमोरी : पत्नी हीनाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे आठ तुकडे केले. त्यापैकी तिचे शीर व करवत चंद्रपूर जिल्ह्यातील व्याहाड खुर्द नजीक असलेल्या चिचबोडीच्या शेतीशिवारातील झुडूपात ठेवल्याची कबुली आरोपी सुधीर कोहाडने दिल्यानंतर आरमोरी पोलिसांनी घटनास्थळावरून हीनाचे शीर व करवत ताब्यात घेतले आहे. सुधीरने आरमोरी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हीना ही सुधीरला स्वत: आत्महत्या करण्याची वारंवार धमकी देत होती. मागील पाच महिन्यांपासून त्याला मानधन न मिळाल्याने तो आर्थिक अडचणीतही आला होता. त्यातच हीनाच्या त्रासामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडायला लागले होते. त्यामुळे त्याने हीनाचा काटा काढण्याच्या उद्देशाने तिला फिरायला जाण्याची फूस लावून १४ एप्रिल रोजी कासवीच्या जंगलात आणले. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तिच्याच साडीने तिची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे आठ तुकडे केले. त्यापैकी एक पाय कोंढाळ्याच्या जंगलात त्याच रात्री नेऊन फेकला. परत घटनास्थळी येऊन हीनाचे मुंडके व धड खताच्या रिकाम्या पोत्यामध्ये भरले व एक पाय व दोन हात घटनास्थळीच ठेवले. त्यानंतर सदर पोते घेऊन तो नवेगाव येथील त्याच्या किरायाच्या खोलीवर आला. दुसऱ्या दिवशी १५ एप्रिल रोजी जेवण केल्यानंतर त्याने पोत्यामधील धड सावली तालुक्यातील खेडी गावाजवळ नेऊन फेकला. तर शीर चिचबोडी गावाजवळच्या एका झुडूपात टाकले. हीनाचे संपूर्ण कपडे त्याने घटनास्ळावरच जाळले, अशी माहिती सुधीरने पोलिसांना दिली. पोलसांनी कासवी व चिचबोडी येथे आरोपीला नेऊन हीनाच्या शरीराचे तुकडे ताब्यात घेतले आहेत.या प्रकरणाचा तपास एसडीपीओ डॉ. राहूल खाडे यांच्या मार्गदर्शनात आरमोरीचे ठाणेदार महेंद्र मोरे, सहायक फौजदार गोकुल मेश्राम, पोलीस उपनिरीक्षक कवाडे करीत आहेत. (प्रतिनिधी)
चिचबोडीच्या शेतशिवारात लपविले होते शीर व करवत
By admin | Updated: May 11, 2015 01:26 IST