धानोरा : स्पर्श सामाजिक संस्था व ग्युज नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने धानोरा तालुक्यातील दुर्गम भागातील गावांमध्ये वस्त्रांसाठी श्रमदान हा उपक्रम सोमवारी राबविला. या उपक्रमात ६६४ कुटुंबांनी सहभाग घेत गावाची साफसफाई केली.धानोरा तालुक्यातील रांगी, रांगी टोला, खेडी, निमनवाडा, मासरगाटा, रेखाटोला, फुलबोडी, झरी, झरी टोला, कारवाफा व गडचिरोली तालुक्यातील कैकडी वस्ती, मसली या गावामध्ये वस्त्रांसाठी काम हा उपक्रम राबविला. या उपक्रमाला गावातील गरीब नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. नागरिकांनी सार्वजनिक विहीर, सार्वजनिक स्थळ, हातपंप, तलावातील गाळ काढणे, पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ करणे, तुंबलेले गटार व नाल्यांची साफसफाई, रहदारीच्या रस्त्याची डागडुजी, शाळा व अंगणवाडीच्या परिसराची स्वच्छता आदी कामे केली. या उपक्रमात सुमारे ६६४ कुटुंबातील २ हजार ८७८ नागरिकांनी सहभाग नोंदविला. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वच नागरिकांना ब्लॅकेट, स्वेटर व धान्य आदी जीवनोपयोगी वस्तूंंचे वाटप करण्यात आले. स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून गरीब नागरिकांना अत्यंत कमी किंमतीत अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाते. मात्र वाढत्या महागाईमध्ये वस्त्र खरेदी करणे गरीब कुटुंबाला शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन स्पर्श संस्थेतर्फे हा उपक्रम राबविला. यावेळी ग्युज संस्थेचे समन्वयक प्रल्हाद पटेल, स्पर्शचे अध्यक्ष डॉ. दिलीप बारसागडे, राजेश शंभरकर, वैशाली डोर्लीकर, बंडू दामले, रायपुरे, कल्याणी गेडाम आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
वस्त्रांसाठी केले श्रमदान
By admin | Updated: March 11, 2015 00:07 IST