कामे अपूर्णच : आदिवासी विकास विभागाचे दुर्लक्षआरमोरी : आदिवासी विकास विभागामार्फत दुर्गम भागातील गरीब आदिवासी कुटुंबधारकांना हक्काचे घर मिळण्यासाठी शबरी आदिवासी घरकूल योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत गडचिरोली, अहेरी, भामरागड प्रकल्पाअंतर्गत जिल्हाभरात जवळपास ७०० घरकूल मंजूर करण्यात आले आहे. मात्र घरकुलाच्या अनुदानाचा एकही पैसा लाभार्थ्यांना मिळाला नसल्याने घरकुलाचे काम अपूर्णच आहे. परिणामी सदर योजना थंडबस्त्यात आहे. गडचिरोली प्रकल्पाने या योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाची यादी जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणेकडे दिली आहे. याचा निधीही डीआरडीकडे देण्यात आले असल्याचे प्रकल्प कार्यालयाच्या वतीने सांगण्यात येत आहे. लाभार्थ्यांना तत्काळ अनुदान द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे पदाधिकारी आनंदराव आकरे, रत्नाजी पेंदाम, वसंत गेडाम, राजेंद्र सयाम, दिलीप घोडाम, महादेव मडावी, मारोती मडावी, भास्कर नारनवरे, विनोद उईके यांनी आरमोरीच्या तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अनुदानाअभावी शबरी घरकूल योजना थंडबस्त्यात
By admin | Updated: February 3, 2016 01:35 IST