अहेरी : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी शिवणयंत्र वितरणाची योजना शासनाच्या वतीने राबविण्यात येत होती. मात्र सदर योजना यावर्षी अनुदानाअभावी रखडली आहे. लाभार्थ्यांचे अर्ज कार्यालयामध्येच पडून आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये शासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. महिलांना स्वयंरोजगार करता येऊन त्या आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने १२ही पंचायत समितीमध्ये शिवणयंत्र वाटपाची योजना राबविण्यात येत होती. २० हजारपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना अनुदानावर शिवणयंत्राचे वाटप करण्यात येत होते. २०१२-१३ या आर्थिक वर्षात अहेरी पंचायत समितीमधील १६ लाभार्थ्यांना शिवणयंत्रणांचे वाटप करण्यात आले. चालू वर्षी या योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले. तालुक्यातून ३० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र या योजनेला निधीच मिळाला नसल्याने शिवणयंत्रांचे वाटप रखडले आहे. यामुळे नागरिकांमध्ये शासनाविषयी तीव्र रोष निर्माण झाला आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण अधिकारी सचिन जाधव यांनीही दुजोरा दिला असून जिल्हा परिषद तसेच आदिवासी विकास विभाग यांच्याकडून निधीच प्राप्त न झाल्याने यंत्रांचे वाटप रखडले आहे, असे लोकमतशी बोलताना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
शिवणयंत्र वितरण योजना रखडली
By admin | Updated: February 20, 2016 02:20 IST